आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरत रेल्वेस्टेशनवरून हरवलेली वृद्धा अडीच वर्षांनी सापडली, भेट होताच कुटुंबीय गहिवरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सुरत रेल्वेस्थानकावरून हरवलेल्या मारवड (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी व सध्या सुरत येथे राहणाऱ्या ८२ वर्षीय लक्ष्मीबाई पानपाटील यांचा अडीच वर्षांनंतर शोध लागला. तिरुअनंतपुरम न्यायालयाने रविवारी त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी जळगाव जिल्हा न्यायालयात उर्वरित सोपस्कार पार पाडण्यात आले. या वेळी त्यांच्या दोन मुली, सून व नातू न्यायालयात आले होते. आई सापडल्याच्या आनंदात त्यांना गहिवरून आले होते. 


मारवड येथील स्वर्गीय कृष्णराव पानपाटील यांचा मुलगा कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने सुरत येथेच स्थायिक झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पानपाटील कुटुंबीय सुरत येथेच वास्तव्यास अाहेत. दरम्यान, पानपाटील कुटुंबीय हे २२ जुलै २०१६ रोजी सुरत येथून एका लग्नाला येण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले होते. या वेळी लक्ष्मीबाई या रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक ४ ऐवजी २ वरून रेल्वेमध्ये बसल्या. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेवूनही त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र, सुरतसह देशातल्या विविध शहरांमध्ये त्यांचा शोध घेतला. दरम्यान, लक्ष्मीबाई या रेल्वेने तिरुअनंतपुरम येथे पोहोचल्या होत्या. 


वयोवृद्ध आणि भाषा कळत नसल्याने त्यांना अडचण आली. तर तिरुअनंतपुरम येथे फिरत असताना तेथील एक समाजसेविका त्यांना भेटली. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना महिला निरीक्षणगृहात दाखल केले. त्यांच्याकडे असलेल्या आधार कार्डवर मारवड (ता. अमळनेर) असा पत्ता होता. त्यामुळे लक्ष्मीबाई यांच्याबाबत विंचूर न्यायालयाने उच्च न्यायालयाला पत्र लिहिले. त्यानंतर तिरुअनंतपुरम काेर्टानने जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाला त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याबाबत पत्र पाठवले. न्यायाधीश जी. ए. सानप यांच्या आदेशानुसार विधी प्राधिकरणाचे सचिव कौशिक ठोंबरे यांनी मारवड पोलिसांशी संपर्क साधला. तसेच नातेवाइकांची ओळख पटवण्यासाठी अॅड. विजय दर्जी यांची नेमणूक केली होती. लक्ष्मीबाई या २ वर्ष ७ महिने निरीक्षणगृहातच होत्या. ४ दिवस सुरत येथे राहिल्यानंतर त्या शुक्रवारी जळगावात आल्या. पानपाटील कुटुंबीयांचे मारवड येथे घर व शेतीही आहे. कधीतरीच ते गावाकडे येत असतात. 


काेर्टाच्या आदेशानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन 
रविवारी तिरुअनंतपुरम न्यायालयाने लक्ष्मीबाई यांना नातेवाइकांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी उर्वरित सोपस्कार करण्यासाठी लक्ष्मीबाई यांच्यासह सून व दोन्ही मुली जिल्हा सत्र न्यायालयात आल्या होत्या. 


व्हिडिओ कॉलिंगद्वारे नातेवाइकांशी संवाद 
लक्ष्मीबाई यांच्या नातेवाइकांना ११ जुलै रोजी न्यायालयात बोलावले होते. कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. लक्ष्मीबाई यांची सून मंगला रामराव पाटील (रा. सुरत), दोन्ही मुली विमलबाई भीमराव ढिवरे (रा.शिरपूर), साधना विनायक वाघ (रा.धुळे) व नातू विशाल विनायक वाघ (रा.धुळे) हे जिल्हा न्यायालयात आले होते. या वेळी व्हिडिओ कॉलिंगद्वारे लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा संवाद साधून देण्यात आला. त्यानंतर नातेवाइकांची त्यांना ओळख पटली.  

बातम्या आणखी आहेत...