आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Online fraud डेबिट कार्ड क्लोन करून गंडा; दहा महिन्यांत 20 लाख उडवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड रिडर, राऊटर, चार मोबाइल सिमकार्ड, संगणक, सिमकार्डच्या आकाराचे २० प्लास्टिकचे कार्ड अशा तांत्रिक वस्तूंचा आधार घेत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या निशांत कोल्हे याने २९ जुलै २०१७ ते १९ मे २०१८ या दहा महिन्यांच्या काळात तब्बल २० लाख रुपये खर्च केले अाहेत. काही मिनिटांसाठी   हाती पडलेल्या दोन जणांचे डेबिट कार्ड क्लोन करून निशांतने ऑनलाइन पेमेंट केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली अाहे. या प्रकरणी गुरुवारी मध्यरात्री त्याच्याविरुद्ध जळगावच्या रामानंदनगर पाेलिसात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील जहिरुद्दीन शेख यांच्या कंपनीतून ८४ हजार ५९९ रुपयांचा माल मागवून ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी निशांत कोल्हे व दिग्विजय पाटील (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. त्यानंतर आठ दिवसांपासून नागपूर, ठाणे येथील सायबर गुन्ह्यातील तज्ज्ञांनी जळगावात येऊन तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत निशांतकडून संगणक, चार सिमकार्ड, मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड अशा तांत्रिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातून दररोज नवीन माहिती समोर येत आहे.

 

निशांत हा एका आंतरराष्ट्रीय रॅकेटसाेबत काम करत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्याचे शिव कॉलनीतील एका बँकेत अकाउंट आहे. या अकाउंटची माहिती पोलिसांनी काढली. यात २९ जुलै २०१७ ते १९ मे २०१८ दरम्यान तब्बल १९ लाख ९८ हजार ७९८ रुपये निशांतच्या खात्यात जमा झाले असून ते नंतर खर्च करण्यात अाले आहेत. १२ वी पास असलेल्या निशांतने १० महिन्यात २० लाख खर्च केल्याचे पाहून तपास करणारे पोलिसही चक्रावले आहेत. निशांतला शुक्रवारी आणखी एका गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 

एका मिनिटात डेबिट कार्ड क्लोन   
निशांत याने शिव कॉलनीतच राहणाऱ्या दोन जणांना गंडवल्याचे शुक्रवारी समोर आले. त्याने दिग्विजय चित्रे व विनोद वेताळ नावाच्या दोन जणांचे डेबिट कार्ड क्लोन केले आहे. याचा वापरकर्त्यांना कुठलाही संशय अाला नाही हे विशेष अाहे. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी संशयावरून चत्रे यांना गुरुवारी रात्री पोलिस ठाण्यात बोलावले. आपले डेबिट कार्ड क्लोन झाल्याचे ऐकून चत्रे देखील भांबावले होते. चित्रे यांची देखील फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली. त्यावरून कोल्हेच्या विरुद्ध रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

कोल्हे तासन््तास प्रयोगशाळेत   
आठ दिवसांपासून निशांत कोल्हे याच्याकडून करण्यात अालेल्या फसवणुकीचा तपास जळगावात पाेलिसांकडून सुरू आहे. या तपासासाठी त्याला पोलिस मुख्यालयातील सायबर क्राइमच्या प्रयोगशाळेत तासनतास बसवून ठेवले जाते आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाइन फसवणूक केल्याचे हे प्रकरण असल्यामुळे तज्ज्ञांना देखील सलग १२-१२ तास तपास करावा लागतो आहे. तपासावेळी कोल्हे याची उपस्थिती आवश्यक असल्यामुळे त्याची देखील प्रयोगशाळेतच विचारपूस केली जात आहे

 

पॉर्न साइट तयार करून खेळण्यांची विक्री   
कोल्हे याच्यासह त्याच्या फेसबुक फ्रेंडसमधील जॉन बर्मन, जाेतिर्मय सहारिया, वायदुरा फुकान (रा.गुवाहाटी), सनी वाघेला (रा.हरियाणा), अभिषेक कुमार (रा.दिल्ली), पुष्पक राठोड (रा.यवतमाळ) आणि प्रणिल राठोड (रा.मुंबई) यांचा तपास पोलिस करीत आहेत. हे संशयित फेसबुकवर पॉर्न साइटचे अकाउंट तयार करून तरुणांना प्रलोभन देतात. यानंतर तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अश्लील खेळणी विकत असतात. कोल्हे याच्या घरून अशाच प्रकारचे एक अश्लील खेळणे पोलिसांनी २१ मे रोजी जप्त केले आहे. या प्रकरणीदेखील स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बातम्या आणखी आहेत...