आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात जखमी झालेल्या रुग्णास लाेकअदालतीत अाणले; साडे 7 लाख रुपये भरपाई देण्याचे अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दीड वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा विमा मिळवण्यासाठी बेशुद्धावस्थेतील एक रुग्ण रतलाम (मध्यप्रदेश) येथून चक्क लोक अदालतीत दाखल झाला. न्यायालयाने पाहणी केल्यानंतर त्यांना साडेसात लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले. दरम्यान, चारचाकीतून आलेल्या रुग्णाला पाहण्यासाठी लोकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

शरद विठ्ठल इंगळे (वय ४२, रा.मस्कावद, ता.रावेर) असे रुग्णाचे नाव आहे. २० जानेवारी २०१७ रोजी इंगळे यांचा अपघात झाला होता. त्यांचे मामे सासरे विश्वनाथ खाचणे यांचा मुलगा विलास याचे निधन झाल्यामुळे ते रुग्णवाहिकेतून भुसावळ येथे मृतदेह नेत होते. या वेळी भुसावळ जवळ त्यांच्या रुग्णवाहिकेस ट्रकने धडक दिली होती. यात रुग्णवाहिकेने तीन पलट्या घेतल्या. या अपघातात इंगळे हे गंभीर जखमी झाले होते. तीन महिने ते कोमात होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून अद्याप ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत. मस्कावद गावात किराणा दुकान चालवणाऱ्या इंगळे कुटुंबीयांवर या घटनेमुळे मोठा आघात झाला. पत्नी, एक मुलगा व एक मुलीची संपूर्ण जबाबदारी पेलणारे इंगळे अंथरुणात खिळले. त्यामुळे आर्थिक परिस्थितीदेखील बिकट झाली. अशा अवस्थेत त्यांच्या उपचाराचा खर्चदेखील सुरू झाला. सध्या ते रतलाम (मध्य प्रदेश) येथे नातेवाइकांकडे उपचार घेत आहेत. दरम्यान, इंगळे यांच्यातर्फे अपघात विमा मिळवण्यासाठी न्यायालयात खटला सुरू होता. शनिवारी लोकअदालत असल्यामुळे त्यांच्या खटल्याचे काम मार्गी लागणार होते.  


यासाठी इंगळे यांना हजर राहणे आवश्यक होते. त्यांची प्रकृती, वैद्यकीय उपचाराची कागदपत्रांची पाहणी न्यायालय करणार होते. यासाठी नातेवाइकांनी इंगळे यांना थेट रतलाम येथून एका खासगी वाहनात झोपवून आणले. वाहनाच्या मागच्या बाजूचे सीट काढून तेथे पलंगाप्रमाणे झोपण्याची व्यवस्था करून त्यावर इंगळे यांना आणले होते. न्यायाधीश चित्रा हंकारे, इंगळे यांचे वकील महेंद्र चौधरी व विमा कंपनीचे वकील अनिल चौगुले यांनी वाहनात जाऊन इंगळे यांची पाहणी केली. यानंतर खटल्याची सुनावणी झाली. इंगळे यांनी १२ लाख रुपयांचा क्लेम केला होता. तडजोडीअंती त्यांना ७ लाख ५० हजार रुपयांचा विमा मंजूर करून त्या रकमेचा धनादेश त्यांच्या पत्नीस देण्यात आला. भरपाई मिळाल्यानंतर न्यायालयात हजर असलेल्या त्यांच्या पत्नीस अश्रू अनावर झाले होते.

 

अपघातात मृत अधिकाऱ्यांस ५३ लाख रुपयांची भरपाई
जळगाव-भुसावळ महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका रिक्षाच्या धडकेत आरटीओ अधिकारी मंगल रमेश मोरे (वय ३५) यांचा मृत्यू झाला होता. १४ ऑगस्ट २०१६ रोजी हा अपघात झाला होता. याप्रकरणी मृत मंगल मोरे यांच्या पत्नी रजनी यांनी संबंधित रिक्षा मालकाने काढलेला विमा कंपनीकडे २ कोटी रुपयांचा क्लेम केला होता. त्यावरही लोक अदालतीत सुनावणी झाली. तडजोडीअंती ५३ लाख रुपयांचा मोबदला मंजूर करण्यात आला. रजनी मोरे यांच्यातर्फे अॅड.महेंद्र चौधरी यांनी काम पाहिले. दरम्यान, लोकअदालतीत झालेल्या तडजोडीमधील ५३ लाख हा सर्वात माेठा आकडा ठरला.

 

राष्ट्रीय लोकअदालतीत ५१ कोटी रुपयांची तडजोड
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशनानुसार शनिवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्यातर्फे राष्ट्रीय लोक अदालत झाली. यात न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी ३ हजार १०४ प्रकरणे व १३ हजार ५३३ वादपूर्व प्रकरणे असे १६ हजार ६३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ५१ कोटी ३१ लाख ८४ हजार ४४४ रकमेची तडजोड करण्यात आली. लोकअदालतीच्या उद‌्घाटनप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जी. ए. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार, शासन, जिल्हा परिषद, विमा कंपनी, बँक, वित्त कंपनी, सेल्युलर फोन, ग्रामपंचायत आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आर. आर. महाजन, कार्यकारिणी सदस्य, वकील संघाचे सदस्य, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव के. एच. ठोंबरे, न्यायाधिश, विधिज्ज्ञ यांची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...