आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजंदारीवरुन झाला वाद, मालकाने केले मजुराच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मालक व मजूर यांच्यात रोजंदारीवरुन झालेल्या वादात मालकाच्या मुलाने थेट मजुराच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यास गंभीर जखमी केल्याची घटना चोपडा शहरात मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, या घटनेत जखमी मजूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. 


दीपक योगराज लोहार (वय ३५, रा. पाटील गढी, चोपडा) असे जखमीचे नाव आहे. दीपक हा राजू सैयद याच्याकडे सुतारकाम करतो. सैयद हा मक्तेदार अाहे. दरम्यान, सैयद व लोहार यांच्यात रोजंदारीवरुन मंगळवारी सकाळी शेतपुरा भागात वाद झाला. काही क्षणातच वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. प्रथम राजू सैयद याने लोहार यास बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याचे दोन्ही हात धरून ठेवत मुलगा रशीद सैयद याने शेजारीच पडलेल्या कुऱ्हाडीने लाेहार यांच्या डोक्यात वार केला. ही घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता घडली. दरम्यान, कुऱ्हाडीचा वार खोलवर गेल्यामुळे लोहार यांच्या डाेक्याचे तुकडे झाले. तर शेजारीच उभा असलेला लोहार यांचा चुलत भाऊ कीर्तन लोहार यांनी ही घटना पाहिली. गंभीर जखमी झालेल्या लोहार यांना सुरुवातीला चोपडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सायंकाळी ६ वाजता त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे रात्री उशिरा लाेहार यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दरम्यान, या घटनेनंतर चोपडा पोलिस ठाण्यात काही जणांनी तक्रार केली. पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी घटनास्थळास भेट देत सैयद पिता-पुत्रास ताब्यात घेतले अाहे. रात्री उशिरा दाेघांवर भादवी ३०७, ३२३, ५०४, ५०६(२), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 


लोहार यांची परिस्थिती हलाखीची 
जखमी लोहार यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. सुतारकाम करुन ते पत्नी व चार मुलांचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना मंगळवारी त्यांच्यावर हा दुःखद प्रसंग ओढवला. चार लहान मुले व पत्नी यांची सर्वस्वी जबाबदारी लोहार यांच्यावरच आहे, अशी माहिती त्यांचे चुलत भाऊ कीर्तन लोहार यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. 

बातम्या आणखी आहेत...