आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 100 कोटींचा प्रस्ताव, 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी शासनाने शुक्रवारी मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश शासनाने जारी केले आहेत. जिल्हा प्रशासनाने बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी शंभर कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

 

जिल्ह्यात दीड लाखावर शेतकऱ्यांच्या कपाशीचे पीक बोंडअळीने फस्त केले अाहे. दरम्यान, बोंडअळीग्रस्त नुकसानीचे सर्वेक्षण शासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी मान्यता दिली आहे. कपाशीचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, तर बागायत क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच देण्यात येणार अाहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या कपाशी पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार ज्या अधिसूचित विमा क्षेत्र घटकासाठी कापूस पिकाचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. केवळ अशाच मंडळातील सर्व कापूस उत्पादकांना ही मदत देण्यात येणार आहे. ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान आढळले असेल अशा शेतकऱ्यांना मात्र मदत मिळू शकणार नाही.


ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असून या मदतीतून कोणत्याही प्रकारची वसुली न करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली होती. मात्र, बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोंडअळीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून 'जी' फॉर्म भरून घेण्यात आले अाहेत. पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावाबाबत अर्ज भरून दिले आहेत. तालुकास्तरीय समितीकडून 'एच' फॉर्म भरून घेण्यात आले हाेते. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतातील कापसाची फरदड नष्ट करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतातील कपाशी नष्ट केलेली आहे. एनडीआरएफ, बियाणे कंपन्या आणि पिक विमा या तिन्हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केलेले आहे.

 

दीड लाखावर शेतकऱ्यांचे नुकसान
बागायती शेती असल्यास प्रती हेक्टर १३ हजार ५०० रुपये, जिरायती शेती असणाऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये मदत मिळणार आहे. जिल्ह्यात २ हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख २० हजार ६५२ आहे. तर बागायती १० हजार ७३९ आहे. बोंडअळीच्या नुकसानीचा जिल्ह्यातील ८१ महसूल मंडळनिहाय अहवाल पाठवण्यात आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...