आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा लाइव्ह रिपोर्ट: ४५० घरांना कुलूप ठोकून ग्रामस्थ पसार; गावातून तरुण, शाळेमधून विद्यार्थीही गायब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हत्याकांडानंतर राईनपाडा गावातील पुरुष मंडळी पसार झाली. अनेक घरांना कुलूप ठोकले. काही घरांमध्ये वयोवृद्ध आणि महिला दिसून आल्या. - Divya Marathi
हत्याकांडानंतर राईनपाडा गावातील पुरुष मंडळी पसार झाली. अनेक घरांना कुलूप ठोकले. काही घरांमध्ये वयोवृद्ध आणि महिला दिसून आल्या.

धुळे- पाच जणांची ठेचून हत्या झालेल्या राईनपाड्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात रक्ताचा कुबट वास भरून अाहे. काळे, तांबड्या रक्ताचे डाग ठिकठिकाणी दिसतात. गावात दहा महिला अन् पाच पुरुष वगळता काेणताही तरुण नाही. शाळेच्या पटावरील विद्यार्थीही गायब अाहेत. राईनपाड्यात अघाेषित कर्फ्यू अाहे. तसाच शेजारील पाच पाड्यांमध्ये असाच कर्फ्यू अाहे. या पाचही पाड्यांवरील जवळपास ४५० घरांना कुलपे ठाेकून नागरिक पसार झाले अाहेत. गावात केवळ वृद्ध नागरिक अाहेत. त्यांना घटनेची माहिती विचारली असता काहीच माहीत नसल्याचा दावा ते करतात. काेंबड्या, बकऱ्यांचा मुक्त वावर तेवढा गावात दिसताे. साेमवारी सकाळपासून शाळेचे दाेन शिक्षक अन् अाराेग्यसेवक तेवढे गावात दिसतात. बाकी सगळीकडे पाेलिसांचाच वावर अाहे. दाेन ते तीन माेठ्या व्हॅन गावात लागलेल्या अाहेत. काेणीही दिसले की त्याला पकडण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. त्यामुळे गावातून सगळेच पसार अाहेत.  


साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात रविवारी अाठवडे बाजाराच्या दिवशी भिक्षा मागणाऱ्या पाच जणांची गावकऱ्यांनी ठेचून हत्या केली. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दिसेल त्या वस्तूने या भिक्षा मागणाऱ्या पाच जणांना ठेचून मारण्यात अाले. त्यामुळे िजल्हा प्रशासन हादरले अाहे. पिंपळनेरपासून २५ किलाेमीटर अंतरावर असलेल्या राईनपाडा येथे जाण्यासाठी दाेन मार्ग अाहेत. त्यातील राेहाेडकडील मार्ग फारसा चांगला नाही. त्यामुळे दहिवेलकडून जाणे साेईस्कर ठरते. ‘दिव्य मराठी’च्या चमूने साेमवारी दहिवेलकडून राईनपाड्यात जायला सुरुवात केली. तेव्हा हा पाडा किती दुर्गम भागात अाहे, याची जाणीव व्हायला लागली. मुळात दहिवेलपासून १५ ते १७ किलाेमीटर अंतरावर असलेल्या राईनपाड्यात जाण्यापूर्वी शिरसाले व इतर पाडे लागले. तेव्हा या गावांमधील व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे जाणवले. मात्र जसे वाहन पुढे जायला लागले. तशी घटनेची भयावहता दिसायला लागली. रस्त्यात लागणाऱ्या बहुतांशी पाड्यांमधील माणसे गायब हाेती. घरांना कुलपे लावली हाेती. पाड्यांमध्ये प्रचंड शुकशुकाट हाेता. अखेर राईनपाड्यात पाेहाेचल्यावर या भयावहतेची परिपूर्ण जाणीव झाली. राईनपाडा गाव असले तरी हे गाव काकरपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येते. जिथे पाच जणांना ठेचून मारण्यात अाले, ते ग्रामपंचायत कार्यालयही काकरदा ग्रामपंचायतीचे अाहे. काकरदा ग्रामपंचायतीत पाच पाड्यांचा समावेश हाेताे. या पाचही गावातील गावकरी रविवारी राईनपाडा येथे अाठवडे बाजाराला अाले हाेते. त्यामुळे बाजारासाठी माेठी गर्दी हाेती. त्यातून मुले पळविणाऱ्यांची टाेळी अाल्याची अफवा जेव्हा बाजारात पाेहाेचली तेव्हा हातची कामे टाकून बहुतांशी बाजार करणारे तरुण भिक्षा मागायला अालेल्या या पाच जणांच्या मागे लागले. त्यांना मारहाण केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात अाणून बेदम मारहाण केली. तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्यात अाले. त्यात पाच जण ठार झाले. त्यानंतर हा सगळा जमाव पांगला. त्यानंतर राईनपाड्यात दुपारनंतर पाेलिसांनी अटकसत्र राबविले. त्यात २३ जण हाती लागले. त्यानंतर राईनपाड्यातील महिला व बालकांसह तरुण व पुरुषांनी गावातून काढता पाय घेतला अाहे. 


राईनपाड्यासह या पाड्याला लागून असलेल्या पाच पाड्यांमधील घरांनाही कुलपे ठाेकली अाहेत. गावात स्मशान शांतता अाहे. केवळ पाेलिसांचा राबता अाहे. पाेलिस वाहनांची गर्दी झाली अाहे.  


मुकी जनावरे चाऱ्याविना बसून 
गावात प्रत्येक घरासमाेर गाई, बैल, शेळ्या बांधलेल्या दिसून अाल्या. या मुक्या जनावरांना दाेन दिवसात काेणीही चारा टाकलेला नाही. त्यामुळे ही जनावरे बसूनच हाेती, असे दिसले. गावात असलेले लाेक दरवाजे लावून बसतात. काेणीही अाले तरी दरवाजे उघडत नाहीत. त्यामुळे काेणतीही माहिती गावातून मिळत नाही.  


पाच पाड्यांचा समावेश 
राईनपाडा हे गाव काकरदा या ग्रुप ग्रामपंचायतीत येते. ग्रुप ग्रामपंचायतीत  निळीघाेटी, हनुमंतपाडा, झाेईपाडा, खर्टीपाडा, राईनपाडा व काकरदा या पाड्यांचा समावेश अाहे. या पाचही पाड्यांमधील जवळपास ४५० घरांना साेमवारी कुलपे ठाेकण्यात अाल्याचे दिसून अाले. गावात तरुण अथवा मुले तसेच महिलाही नाहीत, असे दिसून अाले. अघाेषित संचारबंदीचा अनुभव या गावांमधील शुकशुकाटावरून अाला. अटकेच्या भीतीने गावकऱ्यांनी धूम ठाेकली असावी, असा संशय व्यक्त हाेत अाहे.


अाराेग्यसेवक हजर, काम मात्र नाही 
राईनपाडा येथे राेहाेड प्राथमिक अाराेग्य केंद्रांतर्गत असलेले उपकेंद्र अाहे. या उपकेंद्रात एक परिचारिका कायम रहिवासी अाहेत. अाराेग्यसेवक प्रवीण गिरासे हेही सकाळपासून गावात अाले. मात्र गावातील शुकशुकाट पाहून त्यांनाही काही काम नसल्याची जाणीव झाली. उपकेंद्रात काेणत्याही जखमीला अाणले नाही, अशी माहिती मिळाली. मुळात गंभीर जखमींसाठी हे उपकेंद्रही पुरेशे नसल्याचे दिसून अाले.   


राईनपाडा १०९९ लाेकवस्तीचे गाव
राईनपाडा हे गाव १०९९ इतक्या लाेकवस्तीचे अाहे. या गावात १६९ घरे अाहेत. त्याची अधिकृत नाेंद अंगणवाडीच्या दप्तरी केली अाहे. इतक्याच लाेकस्तीचे इतरही पाडे अाहेत. राईनपाड्याची लाेकसंख्या जवळपास ११०० इतकी असली तरी गावात केवळ १५ जण अाढळून अाले. यातही १० महिलांचा समावेश हाेता.  गावात असलेले बहुतांशी पुरुषही खाटेवरून उठता येणार नाही, इतके वृद्ध अाहेत. यातील बहुतांशी महिला शेतीसाठी बियाणे तयार करायच्या कामात लागल्या हाेत्या.  


अापुलकीचा अाेलावा, घटनेबाबत माैन
गावात नवे चेहरे दिसल्यामुळे महिलांनी पाणी प्रतिनिधींना विचारले. चहाची तयारीही केली. इतकी अापुलकी दाखविणाऱ्या या महिलांना रविवारी झालेल्या पाच जणांच्या  हत्याकांडाविषयी विचारले की, त्या गप्प राहायच्या.‘सकाळी सात वाजताच अाम्ही शेतात काम करायला निघून जाताे’, असे म्हणायच्या. एका वृद्ध महिलेने तर ‘मला दिसत नाही’, असे म्हणून ताेंडावर पांघरूण घेतले. मात्र तासाभरानंतर हीच महिला गल्लीत फिरताना दिसून अाली.


ट्रॅक्टर, जीपसह वाहने उभीच 
राईनपाडा हे सधन लाेकांचे गाव अाहे. या गावात तीन ट्रॅक्टर, दाेन जीप व इतर तीन वाहने अाढळून अाली. मात्र ही वाहने लावून गावातील मंडळी पसार झालेली दिसली.  गावात सिमेंट कांॅक्रीटचे सात रस्ते अाहेत. पाण्यासाठी उंच जलकुंभ अाहे. बहुतांशी घरे काैलारू अाहेत. मात्र पत्र्याची व स्लॅबची घरेही अधूनमधून डाेकावतात. अाश्रमशाळा असली तरी त्यातही शुकशुकाट दिसून अाला. साडेचारशे विद्यार्थ्यांपैकी एकही या शाळेच्या अावारात नसल्याचे दिसून अाले. 


काेणीच अाले नाही : पाेलिस पाटील
राईनपाडा येथे सन १९८९ पासून दाैलत पुंजा बागुल हे ५९ वर्षांचे गृहस्थ पाेलिस पाटील म्हणून काम पाहत अाहेत. ते पुढील वर्षी निवृत हाेणार अाहेत. त्यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा गावात नव्हते. शेतात काम करीत हाेताे. सायंकाळी शेतातून अाल्यावर घटना समजली. मात्र, त्यांच्यापर्यंत काेणी अालेच नाही. गावात काेणतेही अधिकारी अद्याप अाले नाही. 

 

पुढील स्लाइडवर पाहा गावातील शुकशुकाट दर्शवणारे फोटो....

 

बातम्या आणखी आहेत...