आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा धडकल्याने खांब कोसळला; वीज तारा अंगावर पडून महिला भाजली, पती बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आशाबाबा नगरात शनिवारी रात्री ८.४५ वाजता मद्यधुंद चालकाने रिक्षाची धडक दिल्याने ११ एलएमकेव्हीचा विद्युत खांब कोसळला. तर धडक दिल्यानंतर रिक्षा नाल्यात जावून कलंडली. या अपघातात उच्च दाब वीज तारा अंगावर पडून शतपावली करण्यासाठी जात असलेली महिला गंभीररीत्या भाजली असून त्यांचे पती बालंबाल बचावले आहेत. कीर्ती अमाेल राजापुरे (वय २८, रा.अाशाबाबा नगर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

आशाबाबानगरात शिवकॉलनीकडून हरिविठ्ठल नगरकडे जात असलेल्या रिक्षा (एमएच १९, व्ही ७६०१)ने जबर धडक दिली. त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये जावून रिक्षा कलंडली. तर ताण तुटल्यामुळे खांब वाकून खाली कोसळला. याचवेळी आशाबाबा नगरातील अमोल राजेंद्र राजापुरे व त्यांची पत्नी किर्ती या जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी रस्त्याने जात होत्या. तुटलेल्या तारा किर्ती राजापुरे यांच्या अंगावर पडल्या त्या गंभीर जखमी झाल्या अाहेत. तर त्यांचे पती राजेंद्र तेथून पळाल्याने बचावले. दरम्यान, विद्युत खांब पडल्याने आशाबाबा नगर व शिव कॉलनी परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी रिक्षा चालकावर करणार गुन्हा दाखल केला, असल्याचे महावितरण, सहाय्यक अभियंता जे. एच. लढे यांनी सांगितले.

 

चालकाच्या अंगावरून काढली रिक्षा
धडक दिल्यानंतर रिक्षा डाव्या बाजूला असलेल्या नाल्यात जावून कलंडली होती. रिक्षा चालक प्रमोद मोहन कापडे (वय ४०, रा. आशाबाबा नगर) यांच्या अंगावर रिक्षा होती. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नाल्यात पडलेली रिक्षा चालकाच्या अंगावरून काढली. रिक्षात कुणीही प्रवासी नव्हता. या प्रकारानंतर रिक्षाचालक घटनास्थळावरून निघून गेला.

 

बातम्या आणखी आहेत...