आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: 4 ठिकाणी चोरीनंतर मद्यपानासह चोरट्यांनी कोंबड्यांवर मारला ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सुप्रीम कॉलनीतील ईदगाह मैदानाजवळील विरळ वस्तीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून लग्नघरासह चार ठिकाणी चोरी केली. त्यांनी लग्न घरातील वधूचे दागिने आणि ९० हजार रुपये, चार कोंबड्या, मोबाइल, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे फीचे पैसेही चोरून नेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी एका घरातील कुकरमधून घेतलेला भात आणि चोरलेल्या कोंबड्या मोकळ्या जागेत भाजून मद्यपानासह यथेच्छ ताव मारून मोहीम फत्ते झाल्याचा जश्न मनवला.

 

गेल्या वर्षीही मुलाच्या हळदीच्या दिवशी झाली होती चोरी
शेख कुटुंबीयांना घराशेजारील कडुलिंबाच्या झाडाजवळ पत्र्याच्या पेट्या आढळल्या. त्यांचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपडे काढून फेकले होते. शेख यांनी घरात येणाऱ्या नवीन सुनेसाठी ठेवलेली ३ ग्रॅमची पोत, ६ ग्रॅम टाॅप्स, १ ग्रॅमचे डोरले, ३ हजारांचे पैजनासह लग्न खर्चाचे ९० हजार रोख अशा एकूण सुमारे १ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे रज्जाक यांनी सांगितले. त्यांच्या घरी गेल्या वर्षीही मुलाच्या हळदीच्या दिवशी चोरी झाली होती. चोरट्यांनी तीन मोबाइल चोरून नेले होते. सिमकार्ड घरात फेकले होते.

 

मोलमजुरी करून जमवले होते फीचे पैसे
चोरट्यांनी शेख यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या सलाम देशमुख यांच्या घरी चोरी केली. देशमुख यांचे पत्र्याचे घर आहे. घरात हवा येण्यासाठी त्यांनी घराच्या डाव्या बाजूचा पत्रा थोडासा कापलेला आहे. या कापलेल्या पत्र्याजवळ शुक्रवारी रात्री देशमुख यांचा मुलगा दानिश हा झोपलेला होता. तो बांभोरी अभियांत्रिकीमध्ये शिकत आहे. त्याने शेजारील लाकडी खांबाला महाविद्यालयाची बॅग अडकवलेली होती. त्यामध्ये कागदपत्रांसह अभियांत्रिकीची फी भरण्यासाठीचे ३ हजार रुपये ठेवले होते. चोरट्यांनी पत्र्याला लावलेला कपडा काढून घराबाहेरूनच त्याची बॅग ओढली. त्या बॅगमधील ३ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर ती बॅगही कडुलिंबाच्या झाडाजवळ फेकली. देशमुख हे मोलमजुरी करून मुलाला शिकवतात. त्याच्या फीसाठी ३ हजार रुपये जमवले होते. ते सुध्दा चोरट्यांनी चोरून नेल्याचे दानिशच्या आईने सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी या परिसरातील चार कोंबड्याही चोरल्या.

 

चोरट्यांनी मैदानावर केला जश्न
दोन चोऱ्या केल्यानंतर चोरट्यांनी शेख कलीम शेख ख्वाजा यांच्या घरीही चोरी केली. त्यांच्या घरातील कपाटातून १ हजार रुपये, २ मोबाइल व दागिने चोरून नेले. त्यांच्या घरात मटण व भात बनवलेला होता. चोरट्यांनी भाजीचे पातेले उघडून बघितले. मात्र, त्यामध्ये मटण शिल्लक नव्हते. त्यांनी भात असलेला कुकर घराबाहेर आणला. त्यातील भात घेतला. कुकर तेथेच ठेवला. या घराशेजारील किराणा दुकानाचेही कुलूप चोरट्यांनी तोडले. मात्र, दुकानात माल नसल्याने काहीच चोरीला गेले नाही. चार ठिकाणी चोऱ्या केल्यानंतर चोरट्यांनी ईदगाह मैदानाजवळील मोकळ्या जागेत जश्न साजरा केला. चोरटे तेथे देशी दारू प्यायले. त्यानंतर चोरलेल्या कोंबड्या भाजून भातासह त्यावर ताव मारला. शनिवारी तेथे देशी दारूच्या फुटलेल्या बाटल्या व कोंबड्यांची पिसे,एका चोरट्याची चप्पल नागरिकांना आढळून आली. एमआयडीसी पोलिसांनी चोरीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...