आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारमधून आलेल्या आठ जणांचा ट्रकवर सशस्त्र दराेडा, चालकाचा मृत्यू; बाभळे फाट्यावरील थरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे गुरुवारी मध्यरात्री कारमधून आलेल्या २० ते २५ वयोगटातील आठ तरुणांनी ट्रकचालकास लुटत सशस्त्र दराेडा टाकला. यात मारहाणीत ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून २५ हजार रुपयेही लुटून नेले. दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत धुळे शहराकडे पळून गेले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत. 


दिल्ली येथून निघालेला ट्रक ( टी एन ६७/ ए जे ९०७२) हा शिवकाशीच्या दिशेने जात होता. ट्रक गुरुवारी मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना पांढऱ्या रंगाची कार पाठलाग करत असल्याचे चालक अयप्पा स्वामी यांच्या लक्षात आले. त्यानी ही गोष्ट सहचालक कवी अरसन गुरुमूर्ती याला सांगितली. यानंतर ट्रक चालकानेही वाहनाची गती वाढवली. परंतु इतर वाहनांना ओव्हरटेक करत कारने बाभळे फाटापासून काही अंतरावर ट्रक अडवला. यानंतर अयप्पा स्वामी व गुरुमूर्ती यांना मारहाण करत खाली ओढले. तसेच ड्रायव्हर सीट जवळ असलेले वीस हजार रुपये व पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल लुटून नेला. दरोडेखोरांनी अयप्पा स्वामी वीरास्वामी ( वय ५२, रा अम्मापट्टी, ता सातुर, जि विरतुनगर, तामिळनाडू) यांच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यामुळे अयप्पा स्वामी यांचा मृत्यू झाला. तोपर्यँत दरोडेखोर अंधारातून पसार झाले होते. घटनेनंतर जखमी गुरुमूर्ती याने काही वाहन चालकांना थांबवून मदत मागितली. त्यानंतर परिसरातील काही हॉटेल व्यवसायिकही मदतीला आले. शिंदखेडा पोलिसांना कळवण्यात आले. काही वेळानंतर पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, कर्मचारी एच एस चौधरी यांचे पथक दखल झाले. त्यांनी दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शिंदखेड्यामध्ये सध्या स्थायिक झालेल्या दक्षिण भारतीय नागरिकाची मदत घेऊन गुरूमूर्तीशी संवाद साधण्यात आला. दरोडेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कारवर लिहिले होते एसएचआयआर 
दरोडेखोर हे २० ते २५ वयोगटातील होते. शिवाय ते मराठी मिश्रीत हिंदी बोलत होते. यापैकी एकाच्या डोक्यावरील केसांना सोनेरी रंग होता. तसेच त्याच्या उजव्या हातात कडे होते. शिवाय हातावर ओम असे गोंदले होते. यानंतर कारमधून दरोडेखोर पसार झालेत. या कारच्या मागील बाजूस लाल रंगामध्ये एसएचआयआर असे लिहले होते. अशी माहीती गुरूमूर्तीने पोलिसांना दिली आहे. त्यावरुन कारचा शोध सुरू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...