आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरपीएफच्या सतर्कतेमुळे काही तासांतच अट्टल घरफोडे अटकेत, इस्लामपूरा भागात रात्री केली होती घरफोडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - इस्लामपूरा येथील सराफनगर भागात शनिवारी रात्री दोन चोरट्यांनी खेळण्याचे दुकान फोडून २८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. हे चोरटे रात्रीतून रेल्वेने भुसावळ येथे गेले. दरम्यान, भुसावळ स्थानकावरील आरपीएफच्या अधिकाऱ्यांना दोघांवर संशय अाल्याने त्यांनी सतर्कता राखत त्यांची तपासणी केली. तर त्यांच्याकडे आढळून आलेल्या मोबाइलवरून फोन केला असता हा मोबाइल रात्री चोरीला गेल्याची माहिती समोरच्या व्यक्तीने देताच दोघांना ताब्यात घेण्यात अाले. या दाेघांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात दिले असून त्यांनी १० वर्षात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

 

कुंदन नाना पाटील (वय २५, रा. आम्रपाली कॅनलरोड झोपडपट्टी, नाशिक) व गुरूदेव उर्फ पिंटू कृष्णाजी हेमणे (वय २६, रा. जेलरोड, नाशिक) असे घरफोड्या करणाऱ्यांची नावे आहेत. या दोघांनी शनिवारी रात्री शहरातील सराफनगर भागात इम्रान शहा सिद्दीक शहा यांचे खेळण्याचे दुकान फोडले होते. या दुकानातून एक मोबाइल, पैसे व काही खेळणी असा एकुण २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला हाेता. शहा यांच्या फिर्यादीवरून शनि पेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला अाहे. तर चोरी केल्यानंतर दोघे रात्रीतून रेल्वेने भुसावळ येथे गेले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास आरपीएफचे पोलिस उपनिरीक्षक भगवान सोनवणे यांना या दोघांवर संशय आला. त्यांनी स्थानकावरच दोघांची चौकशी सुरू केली. त्यांच्याजवळ असलेला मोबाइल तपासला. तसेच या मोबाइलमध्ये डायल लिस्टमधील एका क्रमांकावर फोन केला. तेव्हा शहा यांच्या नातेवाईकास फोन लागला. हा मोबाइल रात्री चोरीस गेल्याची माहिती त्या नातेवाईकाने सोनवणे यांना दिली. यानंतर सोनवणेंनी दोन्ही घरफोड्यांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

 

त्यानंतर सोनवणे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांना फोन करून माहिती दिली. त्यानुसार रवींद्र पाटील, दीपक पाटील, विनायक पाटील, इद्रिस पठाण, शरीफ काझी, गफुर तडवी, प्रकाश महाजन व सुभाष पाटील यांच्या पथकाने भुसावळ येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. हे दोघे अट्टल घरफोडे असल्याची माहिती समोर आली आहे.

 

त्यांच्याकडून १ मोबाइल, ११ हजार ९०० रूपये रोख व एक पाना मिळून आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोघांनी सुरूवातीला बनावट नावे सांगितली मात्र खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी खरे नाव व पत्ता सांगितला.

 


या गुन्ह्यांची दिली कबुली
कुंदन पाटील याने अल्पवयीन असतानाच दहा वर्षांपूर्वी शहरातील डॉ. चौधरी यांच्या घरातून ११ हजार रुपये व मोबाइल चोरला होता. तसेच या दोघांनी ३१ जानेवारी २०१८ च्या रात्री पाचोरा शहरातील मातोश्री रामेश्वरभाई अग्रवाल पतसंस्थेचे शटर उचकावून १५ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली होती. १ मार्च २०१८ रोजी जळगाव शहरातील कोंबडी बाजार परिसरातील एका देशी दारुच्या दुकानाचा पत्रा कापुन ४ हजार रुपयांची रोकड लंपास केली हाेती. तसेच गेल्या महिन्यात कालिंका माता परिसरातील एका स्वीट मार्टचे शटर तोडून ५०० रुपये चोरले होते. या दोन्ही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले होते.  

 

बातम्या आणखी आहेत...