आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड कामगाराचे २ कोटी रुपये लाटले; धुळ्याच्या सतीश महाले, विनायक शिंदेला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-अमळनेर- धुळे जिल्ह्यातील अशिक्षित ऊसतोड कामगाराच्या मालकीच्या भूसंपादित जमिनीचा वाढीव मोबदल्याचे २ कोटी ५ लाख रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी धुळे शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले आणि माजी नगरसेवक विनायक शिंदे यांना बुधवारी उत्तररात्री अमळनेरात अटक करण्यात आली. दिनेश ठाकरे असे तरुणाचे नाव असून त्याच्या मालकीची जमीन महामार्गातील उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आली होती.त्याच्या वाढीव मोबदल्यापोटी त्याला २ कोटी ८० लाख रुपये मिळणार होते. परंतु महाले,शिंदे आणि इतर दोघांनी त्याच्याशी करारनामा करुन घेत ठाकरे यास केवळ २५ लाख रुपये दिले. उर्वरित रकमेपैकी २ कोटी ५ लाख रुपये परस्पर लाटले. याप्रकरणी बुधवारी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाले व शिंदे या दोन्ही संशयितांना गुरुवारी जळगावच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


ठाकरे हे अशिक्षित असल्यामुळे दोन्ही संशयितांनी त्याचा गैरफायदा उचलून ठाकरे यांच्या मालकीची इनामी जमीन खरेदी केल्याचे भासवून तसा करारनामा करून घेतला होता. त्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याची रक्कम हे दाेघे हस्तकामार्फत वेळोवेळी काढून घेत होते. या दोघांनी आत्तापर्यंत ठाकरे यांच्या खात्यातून २ कोटी ५ लाख रुपये काढले आहेत. सुरुवातीला धुळ्यातील अॅक्सिस बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यात अाले. त्यानंतर २५ मे २०१८ रोजी ठाकरे यांच्या नावाने अमळनेर येथील एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात अाले. तेथून ही दोन वेळा ७५-७५ लाख रुपये काढले. बुधवारी शिंदे व महाले अमळनेर येथील बँकेत ठाकरे यांना घेऊन आले होते. या वेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून या प्रकरणाचा छडा लावला. ठाकरे हा अशिक्षित व भोळा आहे. त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत शिंदे, महाले व आणखी दोन हस्तकांनी त्यांची कोट्यवधींची रक्कम लाटल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार अमळनेर पोलिस ठाण्यात फसवणूक, खंडणी, अपहरण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा उपविभागीय पोलिस अधिकारी रफिक शेख तपास करत आहेत. 


१९ जूनपर्यंत कोठडी
शिंदे व महाले यांना बुधवारी अटक करण्यात आली. गुरुवारी त्यांना जळगावातील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात त्यांना हजर केले होते. शिंदे याचा हस्तक धुडकू मोरे यास अटक करायची आहे. ठाकरे यास २५ लाख रुपये देण्याचा केलेला करारनामा जप्त करायचा आहे. आणखी काही साथीदार ठाकरे याला बँकेत घेऊन जात होते; त्यांचा शोध घ्यायचा आहे, चेकबुक ताब्यात घ्यायचे आहे, अशी कारणे पुढे करत सरकार पक्षाने दोन्ही संशयितांना ७ दिवस पोलिस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद केला होता. तर संशयितांचे वकील एस. टी. दुसाने व अकील इस्माईल यांनी पोलिस कोठडी न मिळण्यासाठी युक्तिवाद केला. संशयित व फिर्यादी यांच्यात लेखी करारनामा झाला आहे. करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे फिर्यादी ठाकरे यास २५ लाख रुपये दिलेले आहेत. संशयित हे राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती असल्यामुळे राजकीय वैमनस्यातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्द पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी अमळनेर येथे गेले असल्यामुळे राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झाला आहे. असा युक्तिवाद इस्माईल व दुसाने यांनी केला. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद एेकून घेतल्यानंतर न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


न्यायालयात गर्दी : सुनावणी वेळी न्यायालयात प्रचंड गर्दी झाली होती. माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह अनेक जण न्यायालयात आले होते. 

 

ठाकरे यांना पैसे ही मोजता येत नाहीत 
फिर्यादी ठाकरे हे ऊसतोड कामगार आहेत. वर्षांतून आठ महिने ते गावोगावी फिरून ऊस तोडीचे काम करतात. अशिक्षित असल्यामुळे त्यांना दोन-पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजता येत नाही. त्यांच्या नावाने २ कोटी रुपये लाटल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या याच भोळेपणाचा फायदा संशयितांनी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...