आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकसाळीतून राष्ट्रीयकृत बॅँकांना अल्प प्रमाणात होतोय वित्त पुरवठा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- खरीप हंगामातील पेरण्या संपण्याच्या मार्गावर असल्या तरी अद्याप ही बळीराजाला कर्ज वाटप करण्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी उदासीनता दाखवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २१ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून याबाबत बॅँकांना वित्त पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे कारण समोर करण्यात येत आहे. 


खरीप पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला असता नागपूर टाकसाळीतून बॅँकांना कमी प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात येत आहे, असे सांगण्यात अाले. बँकांमधून २ ते ४ लाख रूपये वितरित करण्यावर देखील मर्यादा आल्या आहेत. राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये ही परिस्थिती असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ही कर्ज वितरणासाठी पैसा उपलब्ध नसल्याचे कार्यकारी संचालक जितेेंद्र देशमुख यांनी सांगितले. पेरणी संपत आली तरी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप नगन्यच आहे. पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कर्ज वाटप होत नसल्याने शेतकऱ्यांचे मेळावे घेण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींना विचारणा केली होती. सहकार विभागाने त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले अाहे. वित्त पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने कर्ज वाटपाला अडचणी येत आहेत. आतापर्यंत राष्ट्रीयकृत बॅंका, जिल्हा बॅंक मिळून ७२ हजार १७८ शेतकऱ्यांना ६८२ कोटी ५० लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात अाले अाहे. तर २९४४ कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. 


उपनिबंधकांनाच मिळाले नाहीत पैसे 
जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर हे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले होते. ते सहा एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेत. त्यानंतर ही त्यांना एटीएममधून पैसे मिळाले नाहित. हा अनुभव त्यांनी स्वत: राष्ट्रीयकृृत बँकांचे अधिकारी व जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना सांगितला. 


२ हजार रुपयांच्या नोटांची संख्याही झाली कमी 
कमी प्रमाणात वित्त पुरवठ्याबरोबरच बॅंका व एटीएममधून २ हजारांच्या नोटांची संख्याही कमी झाली आहे. या नोटाही येणे बंद झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या नोटा नेमक्या कशामुळे कमी येत आहेत, याबाबत स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी काहिही सांगण्यास नकार दिला. 


तुटवडा नाही 
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्टमध्ये चलन तुटवडा नाही. मात्र, चलन पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. २ ते ४ लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर करण्यावर मर्यादा आलेल्या आहेत. २ हजार रुपयांची नोट बॅंक व एटीएममधून कमी झाल्याबाबत सांगू शकत नाही. 
- सुशील कुमार, प्रादेशिक व्यवस्थापक, एसबीआय 

बातम्या आणखी आहेत...