आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन रसायनांचे मिश्रण जास्त तापल्याने रिअ‍ॅक्टरमध्ये दाब वाढून झाला स्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एमआयडीसीतील गीतांजली केमिकल कंपनीत रविवारी रात्री झालेल्या स्फोटात १० कर्मचारी जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटामुळे कंपनीचे कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. दोन रसायनांचे मिश्रण प्रमाणापेक्षा जास्त तापवल्यामुळे रिअॅक्टरमध्ये दाब वाढून स्फोट झाल्याचा जबाब जखमी कर्मचाऱ्यांनी पाेलिसांना दिला आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा केल्याने कंपनीच्या व्यवस्थापकासह सहा जणांविरुद्ध एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


औषध निर्माण, कृषी, रंग निर्मिती आदी उत्पादनांमध्ये वापरण्यात येणारे वेगवेगळे केमिकल गीतांजली कंपनीत तयार केले जातात. मागणीनुसार द्रव, सॉलिड पावडर स्वरुपात केमिकल तयार केले जाते. रविवारी ज्या विभागात स्फोट झाला तेथे सुमारे २५ कर्मचारी कामास होते. तर रिअॅक्टरच्या आजूबाजूला १० कर्मचारी होते. स्फोटानंतर रिअॅक्टरचे अक्षरश: तुकडे-तुकडे होऊन ते परिसरात विखुरले गेले. सुमारे १० मीटर उंचीवर बनवलेल्या एका माळ्यावरून रिअॅक्टरचा लोखंडी भाग खाली कोसळला. सुदैवाने हा भाग कर्मचाऱ्यांच्या अंगावर कोसळला नाही अन्यथा मोठी अप्रिय घटना घडली असती. स्फोटानंतर जीवाच्या आकांताने जखमी कर्मचारी कसेबसे बाहेर पडले. काहींना उचलून बाहेर आणावे लागले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधारात आणखीच गोंधळ उडाला होता. स्फोटाच्या तीव्रतेमुळे कंपनीतील भिंती तुटून त्याचे अवशेष ५० मीटरपर्यंत फेकले गेले. लोखंडी पाइप वाकले आहेत. तर केमिकल जमिनीवरून वाहिल्यामुळे तेथील फरशादेखील वितळून गेल्या आहेत. सोमवारी सकाळी सूर्य प्रकाशात कंपनीचे विद्रूप रूप समोर आले. 


जखमी कर्मचारी
स्फोटातअतुल सुरेश गजरे (वय २४, रा.नितीन साहित्यानगर), गणेश बन्सीलाल साळी (३८, रा.चिंचपुरा, पिंप्राळा), नीलेश ज्ञानेश्वर कोळी (२७, रा.दिनकरनगर, जैनाबाद), योगेश प्रकाश नारखेडे (५५, सदाशिवनगर, जुना खेडीरोड), धनराज शालिक ढाके (४६, रा.गोपाळपुरा), दिनेश शिवशंकर मिश्रा (वय ३०, रा.रामेश्वर कॉलनी), ज्ञानेश्वर उखर्डू पाटील (३०, रा. कुसुंबा), राजेंद्र उत्तम शिरसाळे (वय ३५), संदीप लालचंद बोरसे (वय ३१) अनिल उत्तम शिरसाळे हे १० जण जखमी झाले आहेत. 


पोलिसांनी घेतले नमुने
एमआयडीसीपोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत यांनी सोमवारी सकाळी १० वाजता घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनी कंपनीतील दोन प्रकारचे केमिकल घटनास्थळावरील केमिकल मिश्रित मातीचे नमुने घेतले. या वेळी कामगार उपायुक्त आर.जे. इडवे, एमआयडीसीचे क्षेत्रिय व्यवस्थापक महेंद्र पाटील, सहायक अभियंता बिपिन पाटील उपस्थित होते. पंचनामा झाल्यानंतर उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी घटनेतील जखमी अनिल शिरसाळे जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी अतुल गजरे यांचे स्वतंत्र जबाब घेतले आहेत. सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील हे सरकारच्या वतीने फिर्यादी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र यशवंत पाटील, डी. डी. इंगळे, श्रीकांत काबरा, सुरेंद्रकुमार मोहता, मधु सुरेंद्र मोहता, पवन कुमार देवरा या सहा जणांच्या विरूद्ध एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कंपनी बाहेर घोषणाबाजी
गीतांजलीकेमिकल या कंपनीच्या मागच्या बाजूस ५० मीटर अंतरावर नितीन साहित्यानगर ही ३६० घरांची वसाहत आहे. या कंपनीतून निघणारे विषारी वायू, कुलिंग टॉवरच्या शॉवरमधून उडणाऱ्या पाण्याच्या थेंबांमुळे परिसरातील लोकांना श्वसन डोळ्याचे विकार होत असतात. याशिवाय रविवारी रात्री झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरातील अनेक घरांचे दरवाजे, खिडक्या हादरल्या. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी घटनेनंतर कंपनीच्या आवारातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली होती. तर सोमवारी सकाळी काही नागरिकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ‘कंपनी बंद करा’च्या घोषणा दिल्या.  


तापमान तपासण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नाही 
केमिकलतयार करण्यासाठी हायड्रोग्रोमीक अॅसिड (एचबीआर) हायड्रोजन पॅरॉक्साइड (एच टू टू) यांचे मिश्रण रिअॅक्टरमध्ये (कँटल) गरम करण्यासाठी सोडले होते. मिश्रण गरम होत असताना त्याचे तापमान तपासण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नसल्याने प्रमाणापेक्षा जास्त उष्णता वाढली. त्यामुळे रिअॅक्टरमध्ये दाब वाढल्याने सुमारे टन वजन असलेल्या लोखंडी रिअॅक्टरचा स्फोट झाला. यामध्ये टन वजनाचे केमिकल होते. हेच केमिकल या विभागात काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांच्या अंगावर उडाल्याने ते जखमी झाले, असा जबाब जखमी अनिल शिरसाळे अतुल गजरे यांनी दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...