आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत जाण्याच्या अर्धा तासापूर्वी सर्पदंश, पाचवीच्या विद्यार्थिनीचा तीन तासांत मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शाळेत जाण्याच्या अर्धा तासापूर्वी घराबाहेर तारेच्या कंपाउंडवरून वाळत घातलेली ओढणी काढताना पाचवीच्या विद्यार्थिनीस सर्पदंश झाला. मात्र, सर्पदंश झाल्याचे तिच्या लक्षात न आल्यामुळे ती शाळेत निघून गेली. त्यानंतर अर्ध्या तासाने शाळेत भोवळ येऊन पडल्यामुळे तिची प्रकृती खालावली. शिक्षकांनी तिला घरी आणल्यावर कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केेले. मात्र, सर्पदंश होऊन तीन तास उलटल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सुप्रीम कॉलनीत बुधवारी सकाळी घडली. 


कावेरी राजेंद्र तीरमले (वय ११, रा.सुप्रीम कॉलनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सुप्रीम कॉलनी परिसरातील शारदा माध्यमिक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकत होती. ती बुधवारी सकाळी ११.३० वाजता घराच्या मागे असलेल्या तारेच्या कपाऊंडवर वाळत घातलेली ओढणी काढत होती. ओढणीच्या मागे असलेल्या सापाने तिच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. बोटातून रक्त येत असल्यामुळे तार टोचला असेल, असा समज तिचा झाला. त्यामुळे तिच्या आईने जखमेवर हळद लावून तिला शाळेत रवाना केले. शाळेत पोहोचल्यानंतर अर्ध्या तासात तिला भाेवळ आली. शिक्षकांनी तिला घरी आणले. प्रकृती खराब होत असल्यामुळे कुटुंबीयांनी तिला परिसरातीलच एका दवाखान्यात नेले. सर्पदंश झाला असल्याचा संशय आल्यानंतर कावेरीस थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात  आले. तिची प्रकृती अधिकच बिकट होत असल्यामुळे तिला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तो पर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर दुपारी दोन वाजता तिची प्राणजोत मालवली.

 

तीन रुग्णालयांत फिरूनही अपयश 
कावेरीच्या मृत्यूची बातमी कळताच सुप्रीम कॉलनीतील शेकडो नागरिकांनी तिरमले यांच्या घराकडे धाव घेतली. उपचारासाठी तीन रुग्णालयात फिरूनदेखील तिचे प्राण वाचवू न शकल्यामुळे तिरमले कुटुंबीयांसह सुप्रीम कॉलनीवासीयांनी हळहळ व्यक्त केली. तिच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थीदेखील घरी हजर झाले होते. कावेरीला दंश करणारा साप जर तिला दिसला असता आणि तिने हा प्रसंग कुटुंबीयांना सांगितला असता तर वेळेवर तिच्यावर उपचार होऊन जीव वाचला असता परंतु दुर्दैवाने सर्पदंश झाल्याचे कावेरीच्या लक्षात आले नाही. 

 

'ती' जागा जीवघेणी 
सुप्रीम कॉलनीत हातमजुरी करणाऱ्या इतर नागरिकांप्रमाणे कावेरीच्या वडिलांचे झोपडी वजा घर आहे. घराला लागूनच शेत व तार कपाऊंड आहे. तर घराशेजारी अडगळीची जागा आहे. एका कोपऱ्यात सरपण गोळा केलेले होते. याच आडोशाला सापाने आश्रय घेतला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही अडगळीची जागाच कावेरीसाठी जीवघेणी ठरली. 
कंपनीत ४० फुटावरून कोसळून मजुराचा मृत्यू 


यांचा वाचला जीव 
मंगळवारी नशिराबादच्या लावण्या वाणी, निमखेडी येथील लाला ठेलारी व रिधुरी येथील नंदकिशोर सोनवणे या तिघांना सर्पदंश झाला. सुदैवाने तिघांवर उपचार होऊन जीव वाचला. तर मंगळवारी कावेरी तिरमलेसह एरंडोल येथील पद्मालयनगरात राहणाऱ्या आकाश हिरामण खैरनार (वय २१) यांना सर्पदंश झाला. दुर्दैवाने कावेरीचा मृत्यू झाला तर आकाशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...