आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहात गांजा पाेहाेचवण्यापूर्वीच संशयिताला पाठलाग करुन पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा उपकारागृहात गुटखा, गांजा, सिगारेट, दारू पोहचवण्याचे प्रकार सुरू असतात. सोमवारी दुपारी गांजाच्या पुड्या पोहचवण्यासाठी कारागृहाच्या परिसरात घुटमळत असलेल्या एका संशयिताला कारागृह पोलिसाने हटकले. संशयिताने पळ काढल्यानंतर पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्याकडून गांजाच्या २० पुड्या जप्त करण्यात अाल्या. या संशयिताविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 


सय्यद सलमान सय्यद कासीम (वय २४, महादेव मंदिराजवळ, तांबापुरा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सलमान हा सोमवारी दुपारी ३.४५ वाजता कारागृह परिसरात संशयितरीत्या फिरत होता. कारागृह पोलिस रवींद्र बागुल यांनी त्यास हटकले. या परिसरात का फिरतोय? अशी विचारपूस केली असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. सलमानच्या पँटचा खिसा फुगलेला असल्यामुळे त्यात काहीतरी असल्याचा संशय बागुल यांना अाला. त्याची चौकशी करण्यास सुरुवात करताच सलमानने कर्मचारी निवासस्थानाकडे पळ काढला. 


महिला रक्षकाच्या अंगावर पडला गांजाचा बॉल 
संशयिताने प्रथम संरक्षक भिंतीजवळ येऊन गांजा भरलेल्या पुडीचा बॉल करून कारागृहात फेकला. ताे कारागृहातील महिला सुरक्षा रक्षकाच्या अंगावर पडला. तेव्हा नवघरे नामक एका बंद्याने धावत येऊन ती पुडी उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


६ महिन्यांपूर्वीही आढळल्या आक्षेपार्ह वस्तू 
पुणे येथील कारागृह महासंचालक भूषणकुमार उपाध्ये यांच्या पथकाने सहा महिन्यांपूर्वी जळगावच्या उपकारागृहास भेट देऊन तपासणी केली होती. या वेळी कारागृहात गुटखा, गांजाच्या पुड्या, डाळी, दुधाच्या पिशव्या, स्वयंपाकाचे साहित्य आढळून आले होते. यामुळे तत्कालीन अधीक्षक सुनील कुवर यांची उचलबांगडी करुन त्यांना औरंगाबाद कारागृहात बदली करण्यात आली होती. जळगाव कारागृहात बाहेरुन अमली पदार्थ आत येतात याचे हे सर्वात मोठे उदाहरण या घटनेतून समोर आले होते. 

 

पद्धत हाेती अवगत 
सलमान हा काही महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यात कारागृहात होता. सध्या तो जामिनावर सुटला. आहे. कारागृहात कशा प्रकारे अंमली पदार्थ पाठवले जातात? ही पद्धत त्याला चांगल्या प्रकारे अवगत आहे. त्यामुळेच तो सोमवारी गांजा पोहचवण्यासाठी आला होता. भिंतीवरुन अंमली पदार्थांचे बंडल फेकणारा एक तरुण नेहमीच कारागृहाबाहेर घुटमळत असतो. पैसे घेऊन तो बंडल आतमध्ये फेकून देतो. त्याच्याशिवाय अनेक टवाळखोर दररोज कारागृहाच्या बाहेर घुटमळत असतात. पैसे घेऊन आतमधून येणारे निरोप बाहेर पोहचवण्याचे काम टवाळखोरांकडून सुरू असते. 

बातम्या आणखी आहेत...