आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा अन‌् पुतण्याच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी गेलेला जळगावचा शिक्षक ट्रकच्या धडकेत ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मुलगा व पुतण्याच्या अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी पुणे येथे गेलेल्या जळगावातील शिव कॉलनीमधील शिक्षकाचा औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव अर्ज फाट्यावर गुरुवारी पहाटे ४ वाजता कार व ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. यात त्याचा मुलगा, पुतण्या व चुलत भाऊ हे तिघे गंभीर जखमी झाले तर सुदैवाने एका मुलाला कुठलीही इजा झालेली नाही. जखमीवर औरंगाबाद व जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात इतका भयानक होता की, कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. 


दीपक रमेशचंद्र चव्हाण (वय ५०, रा. शिव कॉलनी) असे अपघातात मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या चांदसर येथील दत्त हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत हाेते; तर माध्यमिक शिक्षक पतपेढीचे ते संचालकदेखील आहेत. चव्हाण हे मूळचे कानळदा येथील रहिवासी आहेत. दीपक चव्हाण व चुलत भाऊ शेखर चव्हाण हे यश दीपक चव्हाण (वय १८), पुतण्या आयुष सुहास चव्हाण (वय १८) व साहिल शेखर चव्हाण (वय १८) यांच्यासह अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी पुणे येथे बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कारने (क्रमांक एमएच १९, सीएफ ५६३३) गेले होते. तेथील काम अाटाेपल्यानंतर ते सर्व कारने जळगावकडे परतत होते. गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला राष्ट्रीय महामार्गावरील बाेरगाव अर्ज फाट्याजवळ सिल्लोडकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने (क्रमांक टीएन-२८, एडी, ८०७८) जाेरदार धडक दिली. यात कारमधील दीपक चव्हाण हे जागीच ठार झाले. तर अपघातात त्यांचे चुलत भाऊ शेखर चव्हाण, मुलगा यश, पुतण्या आयुष चव्हाण हे तिघे जखमी झाले. शेखर चव्हाण यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साहिल चव्हाण हा देखील कारमध्ये होता; पण त्याला सुदैवाने काेणतीही इजा झाली नाही. 


रुग्णवाहिका बंद पडल्याने उशीर 
दीपक चव्हाण यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी २ वाजता जळगावला येण्यासाठी रुग्णवाहिका निघाली. मात्र, रस्त्यातच रुग्णवाहिका बंद पडली. त्यामुळे मृतदेह जळगावला पोहोचण्यास उशीर झाला. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास चव्हाण यांचा मृतदेह त्यांच्या शिव कॉलनी येथील राहत्या घरी पोहोचला. अपघाताबाबत माहिती मिळाल्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या घरी त्यांचे शिक्षक मित्र व नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचा मृतदेह आल्यानंतर पत्नी, मुलगी व नातेवाइकांनी माेठा आक्रोश केला. 


मुलगा रुग्णालयात, मुलीने दिला अग्निडाग 
चव्हाण यांचा मुलगा यश व पुतण्या आयुष यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वडिलांच्या मृत्यूबाबत एेकून धक्का बसेल, यामुळे नातेवाइकांनी त्याला माहिती दिलेली नव्हती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नेरीनाका स्मशानभूमीत चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी प्रियंका हिने वडिलांना अग्निडाग दिला. शहरात असूनही यशला वडिलांवर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. चव्हाण यांच्या पश्चात वडील, पत्नी, ३ भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे शिव काॅलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात अाहे. 


पाेलिसांची तत्काळ मदत 
अपघाताची माहिती मिळताच वडोदबाजार पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृत दीपक चव्हाण व जखमींना महात्मा फुले रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांच्या मदतीने फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली अाहे. अपघातग्रत ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन राठोड पुढील तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...