आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय वसाहतीत तीन ड्रम स्पिरिट जप्त;बनावट मद्य कारखाना उद‌्ध्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जमनागिरी रोड परिसरातील शासकीय वसाहतीत राजरोस सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा मिनी कारखाना पोलिसांनी सोमवारी उद‌्ध्वस्त केला. तसेच चंद्रप्रकाश गहिंदल पाटील (४८), प्रवीण प्रकाश मराठे (३४) व नीतिराज भानुदास माेरे (१९) या तिघांंना ताब्यात घेतले. बनावट मद्यनिर्मितीचे साहित्यही जप्त केले. चक्क शासकीय जागेचा बेकायदेशीर धंद्यासाठी उपयाेग केल्याचे अाढळून अाले. मात्र जागा काेणाच्या नावावर अाहे, हे काेणीही सांगू शकले नाही. शासकीय दप्तरीही नाेंद अाढळली नाही, असेही दिसले.


पाेलिस भरतीमुळे कधीनव्हे ते सोमवारी बिझी शेड्यूलमध्ये असलेल्या शहर पाेलिसांनी जमनागिरी रोडवरील शासकीय वसाहतीत छापा टाकला. धान्य गोदामाशेजारी असलेल्या या पडक्या परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी चक्क मद्याचा घमघमाट सुटला होता. खोली क्रमांक ४७६०मधून हा घमघमाट येत होता. तर आतमध्ये बनावट मद्यनिर्मिती केली जात होती. शिवाय त्यासाठी स्पिरिटचाही वापर केला जात होता. तीन रूमच्या या खोलीमध्ये पोलिसांना तीन ड्रम स्पिरिट मिळून आले. तसेच रिकाम्या बाटल्या, त्यांची असंख्य बूच, बनावट मद्याने भरलेले बॉक्स मिळून आले. तर घरातील स्वच्छतागृहाची मात्र पार दुरवस्था झाली होती. निरुपयोगी साहित्य व ढीगभर कचरा खोलीत साचला होता. स्वयंपाक खोलीची स्वच्छता व स्वरूप केव्हाच बदलून तेथे रिकाम्या बॉटल्समध्ये मद्य भरले जात होते. तर पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या कॅनमधून रसायनही मिळविले जात होते. मोडकळीस आलेल्या खिडकीतून प्रकाश येऊ नये व बाहेर कोणालाही दिसू नये म्हणून प्लायवूड लावून बंद करण्यात आली होती. तर पहिल्या खोलीत मात्र एक छोटेखानी सोफा होता. निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर पाटील, उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नाना आखाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शिवाय तिघांना ताब्यातही घेतले. कारवाईनंतर पोलिसांनी शेजारी व परिसरातील नागरिकांकडे विचारणा केली; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. कारवाईमुळे या खोलीसमोर असलेली भिंत व पलीकडील रस्ता तसेच इमारतीच्या दोन्ही बाजूस गर्दी झाली होती. तर काही नागरिकांनी कारवाईबद्दल समाधान तसेच नाराजीही व्यक्त केली. होळीचा सण गेला आणि आता कुठे कारवाई केली, असे नमूद करत दिरंगाई झाल्याकडेही अंगुलीनिर्देश केल्याचे दिसले. 

 

१९७१ची इमारत, पत्रिकांवरून शोध 
या इमारतीचे बांधकाम सन १९७१मध्ये झाले आहे. दुमजली या खोलीत चार कुटुंब राहू शकतात. या इमारतीचे आयुर्मान जवळपास संपण्यात अाले आहे. त्यामुळे काही इमारती व घरे अोस पडली आहे; परंतु कारवाई झालेले घर नेमके काेणाला दिले होते हे स्पष्ट झाले नाही; परंतु पोलिसांना घरामध्ये तसेच दरवाजावर काही जुनाट लग्नपत्रिका मिळाल्या. त्या पाहून पोलिसांनी शोध घेतला. खोलीतील भिंतीत असलेले जुनाट लाकडी कपाटातही पोलिसांनी शोध घेतला. 


लोकप्रतिनिधी पुत्राकडे बोट 
पोलिसांनी कारवाई केली. मुद्देमालही जप्त केला; परंतु बनावट मद्यनिर्मितीचा हा मिनी कारखाना नेमका कोणाचा हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही; परंतु संशयित तिघे तसेच हा अवैध धंदा एका लोकप्रतिनिधीच्या मुलगा चालवतो. राजकीय वलय आणि त्याच्या स्वभावामुळे कोणीही बोलण्यास धजावत नाही. यामुळेच कारवाईनंतर माहिती देण्यास कोणीही पुढे आले नाही. पाेलिसांनाही काेणी नीटपणे माहिती दिली नाही. 


दहशत कोणाची... 
कारवाई केलेली खोली व इमारत पडक्या स्वरूपाची आहे. खोली शेजारील एका ज्येष्ठ नागरिकांकडे पोलिस विचारण्यासाठी गेले. प्रारंभी न ऐकल्यासारखे केले. यानंतर 'हम अभी रहने आये है, पता नही यहा कौन रहता', अशी उत्तरे मिळाली. त्यामुळे पोलिसांनी इमारतीवर अस्पष्ट झालेल्या नावांकडे बाेट दाखवत काय लिहिले आहे, अशी विचारणा केली. संबंधित ज्येष्ठ नागरिकाने पुन्हा सावध पवित्रा घेत, 'पता नही, पढना नही अाता' असे सांगितले. तिसरा प्रश्न विचारण्यापूर्वीच ज्येष्ठ नागरिक घरात परतला. दरवाजाअाडून डाेकावला. 
 

बातम्या आणखी आहेत...