आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतरा हजार शेतकऱ्यांची यादी जेडीसीसीने केली नाही अपलोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून कपात केल्यानंतर ही जिल्हा मध्यवर्ती बँकेने सतरा हजार शेतकऱ्यांची यादी मुदतीत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पोर्टलवर अपलोड केलेली नाही तसेच त्याचे पैसेही भरले ही नसल्याचा खुलासा कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे. या प्रकरणात जिल्हा बॅंक व विमा कंपनी एकमेकांवर आरोप करत असल्याने दोन दिवसात या प्रकरणाचा निपटारा करा, अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला दिला आहे. 


पीक विम्याच्या अनुषंगाने झालेल्या घोळाबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रभारी उपप्रबंधक संजय येडगे यांना तातडीने बोलवले होते. जिल्हा सहकारी बँकेने विहित मुदतीत १७ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केलेली नसून त्याचे पैसेही मिळाले नसल्याचे येडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. हा प्रश्न येत्या दोन दिवसांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशी समन्वय साधून सोडवा, अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला दिला आहे. पीक विम्याच्या पैशांबाबत बॅंक व विमा कंपनी एकमेकांवर आरोप करत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कंपनीच्या उपप्रबंधकाला नोटीस ही बजावलेली हाेती. तेव्हा कंपनीने हा खुलासा केला. 


संपूर्ण पैसे देऊन याद्या देखील केल्या अपलोड 
जिल्हा बँकेच्या ज्या सभासदांनी पीक विम्याची रक्कम दिलेली आहे. ती संपूर्ण रक्कम विमा कंपनीला देण्यात अाली असून मुदतीत सर्व शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. मुदत झाली होती, तर कंपनीने पैसे का स्वीकारले? वर्षभरात पैसे का घेतले? हा प्रश्न आहे. जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅंक 


दोन दिवसांची दिली मुदत
पीक विम्याच्या हप्त्यांबाबत १२ कोटींचा विषय बॅंक व कंपनीमध्ये सुरू आहे. यादी पाठवली असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. तर यादी अपलोड केली नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन दिवसाची मुदत कंपनीला देण्यात आली आहे. 
- किशोर राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी 


एजन्सीला यादी अपलाेड करण्याचे दिले हाेते काम 
जिल्हा बँकेने विहित मुदतीत सतरा हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली नाही. एजन्सीला हे काम देण्यात आले होते, असे बँकेचे म्हणणे आहे. मात्र, पोर्टलवर ही यादी अपलाेड झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत बोलवले होते. त्यांनी दोन दिवसांमध्ये याबाबत निपटारा करण्याची मुदत दिली आहे. 
- संजय येडगे, उपप्रबंधक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी

बातम्या आणखी आहेत...