आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- राज्याच्या वीज मागणीने बुधवारी (दि. १७) तब्बल २० हजार मेगावॅटचा टप्पा पार केला आहे. यापैकी महावितरणची वीज मागणी १७ हजार ८८७ मेगावॅट होती. हिवाळ्यातील ही मागणी पाहता येत्या उन्हाळ्यात भारनियमनाचे भूत पुन्हा राज्याच्या मानगुटीवर बसण्याची दाट शक्यता आहे.
मे महिन्यात राज्याची मागणी १८ ते १९ हजार मेगावॅटदरम्यान, तर महावितरणला १६ हजार ५०० ते ९०० मेगावॅट विजेची दैनंदिन गरज भासते. मात्र, सध्या गेल्या ४ दिवसांपासून तापमानात वाढ होऊन राज्याची वीज मागणी वाढली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजेदरम्यान महावितरण कंपनीला १७ हजार ८८७ मेगावॅट विजेची गरज भासली. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याशी तुलना करता ही मागणी सुमारे ९०० मेगावॅटने जास्त आहे. तसेच बुधवारी संपूर्ण राज्याला २० हजार ७२३ मेगावॅटची गरज भासली. गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत ती १ हजार मेगावॅटने जास्त आहे. सध्या घरगुती क्षेत्रातून विजेचा पूर्ण वापर नाही. रब्बी पिकांसाठी कृषी क्षेत्रातून मात्र विजेची मागणी वाढली आहे. हे चित्र पाहता येत्या उन्हाळ्यात विजेची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण होऊ शकते.
जलविद्युतमधून ७३२ मेगावॅट
महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढवूनदेखील गरज भागवली जात नाही. यामुळे महानिर्मितीने कोयना टप्पा १ ते ४, घाटघर जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मिती वाढवली आहे. जलविद्युत क्षेत्रातून बुधवारी ७३२ मेगावॅट, तर सौरऊर्जा प्रकल्पातून ११० ते ११३ मेगावॅट वीजनिर्मिती झाली.
भारनियमनाचे संकेत
राज्यातील महानिर्मिती, खासगी वीजनिर्मिती उद्योग आणि सेंट्रल सेक्टरमधून विजेची गरज भागवली जाते. सध्यातरी भारनियमन नाही. मात्र, येत्या पंधरवड्यात पुन्हा विजेची मागणी वाढल्यास महावितरणच्या डी, ई, एफ, जी १ ते ३ या ग्रुपवर १ ते ३ तासांचे भारनियमन सुरू होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.