आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानदाराकडे लाच मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांना पकडले; त्रिकुटाचे बिंग फुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे, साक्री- आम्ही लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आहोत, तुमच्या रेशन दुकानात गैरप्रकार सुरू आहे. तुम्ही जनतेला फसवत आहात. एक हजार रुपये द्या, अन्यथा दंड करू, अशी बतावणी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तोतया अधिकाऱ्यांना साक्री तालुक्यातील भोनगाव येथे शुक्रवारी पकडण्यात आले. त्यांनी केवळ एक हजारांची मागणी केल्याने संशय आला. त्यानंतर नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्रिकुटाचे बिंग फुटले. 


भोनगाव येथील दिनेश यशवंत बोरसे ( वय ३६ ) यांचे रेशन दुकान आहे. शुक्रवारी दुकानात असताना पांढऱ्या रंगाची बोलेरो कार ( एम एच १८/ टी सी ९०) आली. गॉगल लावलेल्या तिघांनी वेगाने कारचे दार उघडून सिनेस्टाइल पद्धतीने दुकानात प्रवेश केला. बोरसे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यातील एकाने आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आहोत, असे सांगितले. तुम्ही, रेशनचा काळा बाजार करतात. शासनाची फसवणूक केली आहे. असे म्हणत तिघांनी कागदपत्रांची मागणी केली. त्याचवेळी तिघांमधील एकाने हळूच बोरसे यांना एक हजार रुपये द्या, प्रकरण रफादफा करू असे सांगितले. तिघांचा पेहराव, त्यांनी सांगितलेले पद आणि फक्त एक हजार रुपयांची केलेली मागणी यामुळे बोरसे यांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यामुळे बाेरसे यांनी तिघांना बोलण्यात गुंतवून ठेवले. शिवाय रेशन दुकानदार संघटना, तहसील कार्यालयात या घटनेची माहिती दिली. थोड्या वेळातच रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले. त्यांनी तिघांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर तिघांचे बिंग फुटले. त्यांना चोप देत पोलिस ठाण्यापर्यंत नेले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी आपली नावे राजेश शत्रक पाडवी ( ४९), अमोल अशोक गावित (३३), अंकित विश्वास वळवी ( २५ तिघे रा. बोरपाडा ता. नवापूर) अशी सांगितली. त्यानंतर दिनेश यशवंत बोरसे यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 


शिक्के तयार करणाऱ्याचा शोध 
पोलिसांनी तिघांकडून जप्त केेलेले वाहन नवीन आहे. याशिवाय त्यांच्याकडून बनावट शिक्के, इंकपॅड, बनावट आधार कार्ड व स्टॅपलर आदी साहित्य जप्त करण्यात आले. यावरुन बनावट शिक्के तयार करणाऱ्यांचाही शोध घेतला जाऊ शकतो. यासाठी संशयितांकडे विचारपूस सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...