आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; गुजरात सीमेवर काट्याची टक्कर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या झंझावाती प्रचाराने गाजत असलेल्या गुजरात विधानसभेचा निकाल काय लागतो, याची देशातच नव्हे, तर देशाबाहेरही उत्सुकता आहे. या राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांनी होत आहे. भाजपचा बालेकिल्ला ठरलेल्या गुजरात विधानसभेत गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच सत्तांतराची चर्चा होत आहे. भाजपला सत्ता सोडावी लागेल की नाही, हे सांगणे कठीण असले तरी काँग्रेसने भाजपच्या तोंडाला फेस आणला आणि विकास वेडा झाला आहे, हे लोकांना पटवून देण्यात यशस्वी ठरली. यासारखेच घमासान सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या जिल्ह्यातील लोकांचे नेहमीच सुरत, अहमदाबाद, बडोदा येथे जाणे-येणे असते. त्यांचा दैनंदिन व्यवहार गुजरातशी निगडित आहे; पण निवडणुकीत त्यांनी कधीच काँग्रेसचा हात सोडला नाही.

 

मोदी पंतप्रधान होताना मात्र नंदुरबारने काँग्रेसला हात दाखवून भाजपला डॉ. हिना गावित यांच्या रूपात खासदार दिला. गांधी, नेहरूंपासून काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहिलेल्या या जिल्ह्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विजय मिळवणे अवघड झाले आहे. गुजरात विधानसभेसोबतच सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर आणि तळोदा या तीन पालिकांची बुधवारी (१३ डिसेंबर) निवडणूक होत आहे. या तिन्ही पालिकांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे; पण या वेळी भाजपनेही ताकद पणाला लावली आहे. भाजपचे खासदार आणि आमदार असले तरी ते एकाच घरातील आहेत. याशिवाय पक्षाची संघटनात्मक ताकदही काँग्रेसपेक्षा कमी आहे. त्यांना उमेदवार मिळणे अवघड होते. काँग्रेस, राष्ट्रवादीतून आयात करून भाजपने नगराध्यक्ष, नगरसेवकपदासाठी उमेदवार दिले. त्यामुळे या तिन्ही पालिकांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. नंदुरबार पालिकेत सध्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी या नगराध्यक्षा आणि एकमेव जागा सोडली तर सर्व ३६ नगरसेवक त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे रघुवंशी यांनी मूलभूत सोयी-सुविधा देऊन शहराचा चेहरा बदलवण्याचा प्रयत्न केला; पण केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला नंदुरबार पालिका ताब्यात घेण्यासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार असलेल्या शिरीष चौधरी यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासाठी चौधरी समाज एकवटला आहे. हिंदू- मुस्लिम दंगलीमुळे सामाजिक ध्रुवीकरण झाले. याशिवाय साम, दाम, दंड, भेदाचा वापर होत असल्यामुळे गुजरातसारखेच वातावरण नंदुरबारात पाहायला मिळत आहे. नवापूरमध्ये यापेक्षा निराळी स्थिती नाही. माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, विजयाचा विक्रम करणारे खासदार माणिकराव गावित हे काँग्रेसचे नेते याच तालुक्यातील आहेत. त्यांची दुसरी पिढी निवडणुकीची धुरा सांभाळत असली तरी येथे अजून काँग्रेसला सक्षम पर्याय उभा राहिलेला नाही. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढवल्या आहेत. त्यामुळे भाजपला उमेदवार मिळणेही अवघड होते; पण त्यांनी काँग्रेसच्या विद्यमान उपनगराध्यक्ष राहिलेल्या ज्योती जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. सर्वसाधारण महिला जागा असल्यामुळे काँग्रेसनेही प्रथमच बिगर आदिवासी हेमलता अजय पाटील यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने उच्चशिक्षित आदिवासी महिला डॉ. अर्चना वळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नवापूरमध्येही या वेळेस अटीतटीचे चित्र पाहायला मिळत आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपचा आमदार निवडून देणाऱ्या तळोदा पालिकेत काँग्रेसने पुन्हा ताकद दाखवल्यामुळे येथेही भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र आहे.

 

काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी, भरत माळी हे काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरले आहेत.  एकंदरीत भाजपचा गड असलेल्या गुजरात राज्यात जसे काँग्रेसने कडवे आव्हान उभे केले आहे, अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तिन्ही पालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भाजपने आव्हान दिले आहे. त्यामुळे गुजरात विधानसभेबरोबरच सीमेवरील शहरांच्या पालिका निवडणुकीच्या निकालांचीही राज्यात उत्सुकता असणार आहे.    

 

- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...