आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू डंपरची वृद्धास धडक; चालकास चाेप; अर्धा तास गाेंधळ सुरू असल्याने वाहतूक ठप्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातून मार्गक्रम हाेणारे वाळूचे डंपर नागरिकांच्या जीवावर उठले अाहे. शनिवारी डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा हात तुटला हाेता. तर सोमवारी सकाळी ९.३० वाजता घाणेकर चौकात भरधाव डंपरने पायी चालणाऱ्या वृद्धास धडक दिली. यात वृद्धाच्या डाव्या पायावरून चाक गेल्याने पंजाचा चेंदामेंदा झाला. नागरिकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरचालकास चोप दिला. तसेच डंपरच्या काचा फोडल्या. या वेळी डंपर पळवण्याचा देखील प्रयत्न झाला. सुमारे अर्धा तास हा गाेंधळ सुरू असल्याने वाहतूक खाेळंबली हाेती. शनिपेठ पाेलिसांनी गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात अाणली. 


रामदास झिपा भील (वय ६५ रा. जुना खेडी रोड) असे जखमीचे नाव असून ते मजुरी करतात. सोमवारी सकाळी ते गांधी मार्केटच्या दिशेने पायी जात असताना शिवाजी राेड वरून सुभाष चौकाकडे वळण घेत असताना घाणेकर चाैकात वाळूने भरलेल्या डंपरने (क्रमांक एमएच- १०, बीजी- २३१३) त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावर कोसळले त्यामुळे डंपरचे चाक त्यांच्या डाव्या पायाच्या पंजावरून गेले. यात पंजाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. भील हे विव्हळत असताना काही नागरिकांनी त्यांना रिक्षातून खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर घाणेकर चौकात संतप्त जमाव जमला होता. जमावाने डंपरच्या काचा फोडल्या. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. नागरिकांनी डंपर अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. या वेळी शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी येऊन गर्दी पांगवली. त्यानंतर भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरचालक स्वप्निल भीमराव धनगर (वय २३, रा.फेकरी, ता.भुसावळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी धनगर याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक खेमराज परदेशी तपास करीत आहे. 


पळून गेलेल्या चालकास पकडून दिला चोप
अपघातानंतर डंपरचालक धनगर हा सुभाष चौकाच्या दिशेने पळून गेला. चौकातील काही नागरिकांनी त्याला पाहिले होते. दोन जणांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्याला पुन्हा घटनास्थळी घेऊन आले. तेथे संतप्त जमावाने त्यास चोप दिला. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून धनगर याची सुटका केली. मारहाणीत त्याच्या शर्ट फाटला होता. नागरिकांनी गोड बोलून पकडून आणत मारहाण केल्याचे धनगर याने पोलिसांना सांगितले. 


शहर पोलिसांनी 'तो' डंपरही केला जप्त
शनिवारी सायंकाळी दूध फेडरेशनसमोर दुचाकीस्वार अर्जुन वैष्णव याला डंपरने (क्रमांक एमएच- १९, वाय- ३७५७) धडक दिली होती. विलास यशवंत यांच्या मालकीचा हा डंपर आहे. शहर पोलिसांनी हा डंपर घटनेच्या दिवशी जप्त केला नव्हता. पोलिस वाळू व्यावसायिकांवर 'मेहरनजर' ठेवत असल्याच्या या प्रकारावर 'दिव्य मराठी'ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले. यानंतर सोमवारी दुपारी १ वाजता शहर पोलिसांनी हा डंपर जप्त करून पोलिस ठाण्यात आणला. 


डंपर पळवण्याचा प्रयत्न 
जमावाकडून डंपरवर दगडफेक सुरू झाल्यानंतर घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेले शनिपेठ पोलिस स्टेशनमधील कर्मचारी १० मिनिटांनी दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगवत डंपर ताब्यात घेऊन शिवाजी रोडवरील रस्त्यावर उभा केला. यानंतर एकाने गुपचूप हा डंपर पळवून नेत पोलिस ठाण्यात घेऊन न जाता वेगळ्या ठिकाणी नेला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा शोध घेऊन हा डंपर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेऊन जप्त केला. ललित चौधरी (रा. जुने जळगाव) यांच्या मालकीचा हा डंपर आहे. 


शस्त्रक्रियेचा पर्याय 
अपघातात भील यांच्या पायाचा पंजा चेंदामेंदा झाला आहे. तसेच अती रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना भाेवळ देखील आली होती. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून डाॅक्टरांनी पायावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...