आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकचालकाच्या कानशिलावर बंदूक ठेवून 5 लाखांची लूट; चाैघांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - २२ चाकी अवाढव्य ट्रकमधून गुजरातला लोखंडी बिम घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाच्या कानशिलावर बंदूक ठेवून बेदम मारहाण करीत आठ दरोडेखोरांनी सुमारे पाच लाख रुपयांचे लोखंडी बिम आणि ट्रकचालकाच्या खिशातील १७ हजार रुपयांची लूट केल्याची थरारक घटना मंगळवारी रात्री घडली. लूट केल्यानंतर या ट्रकचालकास रातोरात जळगावातील एमआयडीसी भागात आणून सोडले. त्यानंतर हे दरोडेखोर हरताळा जंगलात पळून गेले. बुधवारी ट्रकचालकाने तक्रार देताच जळगाव पोलिसांनी तपासचक्रे गतीने फिरवून चालकास लुटणाऱ्या ४ दरोडेखोरांना हरताळा जंगलात पाठलाग करून पकडले. झटापटीत ३ पोलिस जखमी झाले आहेत.

 

ट्रकचालकाच्या लूट प्रकरणाशी चार राज्यांशी संबंध आला. उत्तर प्रदेशचा चालक छत्तीसगड येथून लोखंडी बिम घेऊन गुजरातमधील जामनगर शहराकडे निघाला होता. त्याला विदर्भाच्या नांदुरा (जि.बुलडाणा ) येथे लुटले. खान्देशात आणून टाकले. अखेर जळगाव पोलिसांनी चपळाईने कारवाई करून गुरुवारी पहाटे आठपैकी चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. ट्रक चालक संदीप भंजनलाल पाल ऊर्फ जलेदारकुमार(वय २७, रा.लालाभगत, बिरहोन, रसुलबाद, जि.माती, कानपूर) हा एकटाच २२ चाकी ट्रक (सीजी ०४ एलयु ५१३९) घेऊन ४ मार्च रोजी छत्तीसगड येथून जामनगर जाण्यासाठी निघाला होता. ट्रकमध्ये लोखंडी बिम होते. ५ मार्च रोजी तो रायपूर येथे पोहचला. ट्रकमालक मनदीपसिंग बलदेवसिंग यांनी टोल तसेच डिझेलसाठी त्याच्याकडून १७ हजार रुपये दिले होते. तर पाल याच्याकडे स्वत:चे ५ हजार रुपये होते. दरम्यान, ६ मार्च रोजी सायंकाळी रात्री ७.३० वाजता पाल हा खामगाव येथे पोहचला. तेथून बुलडाणा मार्गे पुढील प्रवास करणार होता. याचवेळी मागून येणाऱ्या एका चारचाकीने (एमएच २२ डी ७०००) पाल याच्या ट्रकला १० ते १२ वेळेस ओव्हरटेक केले. चारचाकीमध्ये आठ भामटे बसलेले होते. त्यांच्यावर संशय आल्यामुळे पाल याने सावधगिरीने प्रवास सुरू ठेवला होता.


परंतु, नांदुरा गावाजवळ खराब रस्त्याचा बहाणा करीत ट्रकच्या समोर येत चारचाकी चालकाने अचानक ब्रेक मारला. यानंतर चारचाकीतून चार भामटे खाली उतरले. त्यांनी थेट ट्रकच्या केबिनचा ताबा घेतला. पाल याच्या कानशिलावर बंदूक लावली. एकाने चॉपरचा धाक दाखवला. तर एकाने पाल याच्या तोंडात कापड कोंबून आणि डोळ्यावर पट्टी गुंडाळून त्याला मागच्या सीटवर फेकून दिले. यानंतर चौघांनी हा ट्रक मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा जंगलाच्या भागात आणला. तेथे ट्रकमधील ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे ८ लोखंडी बिम खाली उतरवले. पाल याच्या खिशातील १७ हजार रुपये व ट्रकचे आरसी बुक देखील काढून धेतले. पाल याला पुन्हा ट्रकमध्ये बसवून जीवे ठार मारण्याची धमकी देत जळगावच्या एमआयडीसी परिसरात आणून सोडून दिले.
दरम्यान, दराेडेखाेरांना पकडण्यासाठी तयार केलेल्या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, रामकृष्ण पाटील, मनोज सुरवाडे, विजय दामोदर पाटील, विजय श्यामराव पाटील, किशाेर पाटील, असिम तडवी व अतुल पाटील अादींचा समावेश हाेता.

 

जळगावात चालकाने पोलिस ठाणे गाठले
आजूबाजूला काहीच आवात येत नसल्यामुळे काही वेळाने पाल याने तोंडातील कपडा, डोळ्यावरील पट्टी सोडली. समोर असलेल्या कंपनीच्या नावावरून आपण जळगावच्या एमआयडीसी परिसरात असल्याचे त्याला समजले. ट्रकमधील लाेखंडी बिम व खिशातील पैसे देखील गहाळ होते. यानंतर बुधवारी सकाळी त्याने लोकांच्या मदतीने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. ट्रकमालक मनदीपसिंग यास फोन केला असता, त्याने मी आल्याशिवाय तक्रार देऊ नको ,असे कळवले होते. त्यानुसार बुधवारी रात्री ९ वाजता पाल हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक रात्रीच भामट्यांच्या शोधासाठी निघाले होते. गुरुवारी पहाटे पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी बिम, पैसे तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत.


असा लागला छडा
पाल याने बुधवारी रात्री एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर एमअायडीसी पाेलिसाचे पथक भामट्यांच्या शोधासाठी निघाले. हरताळा भागात रस्त्याच्या कडेला अंधारात काही लोक लोखंडी बिम एका ट्रकमध्ये भरत असल्याचे त्यांना दिसून आले. ते दरोडेखोर असल्याचा संशय बळावताच पोलिसांनी थेट त्यांच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांना पाहून भांबावलेल्या भामट्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सुमारे ३ किलोमीटर पाठलाग करून चार भामट्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, दरोडेखोरांचा पाठलाग करीत असताना खंडागळे, रामकृष्ण पाटील, सुरवाडे हे तीन पोलिस कर्मचारी झटापटीमध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.

 

यांना केली अटक
संदीप भंजनलाल पाल या ट्रकचालकाला लुटणाऱ्या शेख हसन शेख सलीम (वय ३०, रा.जाम मोहल्ला, भुसावळ), शेख फारुख शेख जमाल (वय ३६, रा.मुक्ताईनगर), शाबीर शाह अमान शाह (वय २८) व आरिफ शाह सुभान शाह (वय २९, दोघे रा.मलकापूर) या चार दरोडेखाेरांना पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...