आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री पेयजल याेजनेची कामे मॅनेज करण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यात शासनाने मंजुरी दिलेल्या मुख्यमंत्री पेयजल याेजनेतील २५ कामांची ई-निविदा प्रक्रिया सध्या सुरू अाहे. ही ई-निविदा प्रक्रिया सुरू असताना स्पर्धक कंत्राटदारांचा शाेध घेऊन त्यांच्याकडून मी निविदा प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे पत्र मिळवून या याेजनांची कामे मिळवण्याचा राजकीय प्रयत्न हाेत असल्याची माहिती पुढे अाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली अाहे. प्रशासनाने मात्र राजकीय दबाव झुगारून निविदा प्रक्रिया सुरू ठेवली अाहे. 


मुख्यमंत्री पेयजल याेजनेत जळगाव जिल्ह्यात ७१ याेजनांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात अाला हाेता. त्यापैकी तांत्रिक मान्यता मिळालेल्या ६४ याेजनांना शासनाने मंजुरी दिली हाेती. मंजुरी मिळालेल्या याेजनांपैकी जिल्हा परिषदेने ५२ याेजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यापैकी २७ याेजनांच्या निविदा उघडून २७ कामांचे कार्यारंभ अादेशदेखील देण्यात अाले. १२ याेजनांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू अाहे. ई-निविदा प्रक्रियेत असलेल्या उर्वरित २५ कामांची ई-निविदा मागवण्यात अाल्या हाेत्या. त्या देखील तांत्रिकदृष्ट्या तपासण्यात येत अाहेत. निविदा अंतिमत: उघडण्यापूर्वीच त्या मॅनेज करण्याचे राजकीय प्रयत्न सुरू झाले अाहेत. निविदा भरलेल्या ठेकेदारांचा शाेध घेऊन मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी इतर स्पर्धक ठेकेदारांकडून मी निविदेतून माघार घेत असल्याचा अर्ज घेतला जात अाहे. गेल्याच अाठवड्यात जिल्हा परिषदेतील काही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निविदा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. 


ई-निविदेतून माघार नाहीच 
एखाद्या ठेकेदाराने ई-निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला तर त्याला निविदा उघडल्यानंतर त्यातून माघार घेता येत नाही. किमान ३ निविदा पात्र असतील तरच निविदा मंजूर केली जाते. मात्र, मुख्यमंत्री पेयजल याेजनेत काही कामांमध्ये ४ ते ५ निविदा प्राप्त झाल्या अाहेत. यातून काहींना पत्र घेऊन माघार घेण्यासाठी अर्ज करण्याचा दबाव टाकला जात अाहे. प्रशासनाने मात्र अशा माघारीच्या अर्जांना कायदेशीर शून्य अर्थ असल्याचे म्हटले अाहे. काेणीही ठेकेदार अर्ज देऊन निविदेतून माघारच घेऊ शकत नसल्याची बाजू प्रशासनाने मांडली अाहे. 


नियमानेच ई-निविदा प्रक्रिया 
मुख्यमंत्री पेयजल याेजनेच्या ई-निविदा या नियमानुसारच उघडण्यात येतील. जे नियमात अाहे, त्याप्रमाणेच केले जाईल. पत्र देऊन काेणीही निविदेतून माघार घेऊ शकत नाही. 
- एस. बी. नरवाडे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद. 

बातम्या आणखी आहेत...