आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना पाहून दोन जुगाऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, पडले गटारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक व्ही. के. चौबे बुधवारपासून तीन दिवसांसाठी जिल्ह्यात तपासणीसाठी दाखल झाले. दरम्यान, पहिल्याच दिवशी त्यांची चाळीसगाव, पाचोरा विभागाच तपासणी सुरू असताना जळगाव शहरात जुने बसस्थानक परिसरात एका अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्याच्या नादात दोन जुगाऱ्यांनी दुसऱ्या माळ्यावरुन उडी मारली खरी; परंतु ते गटारीत पडल्याने गंभीर जखमी झाले.

 

सुनील श्रीराम पवार (वय ४०, रा.शिवाजीनगर) असे जखमी झालेल्या जुगारीचे नाव आहे. तर एक जुगारी जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन घरी निघून गेला. शहरातील जुने बसस्थानक परिसरात हा पत्त्यांचा क्लब सुरू आहे. शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर सहायक फौजदार वासुदेव सोनवणे यांनी दोन पंचांसह पायी जाऊन या क्लबवर धाड टाकली. पोलिसांचे पथक क्लबवर आल्यामुळे तेथे पत्ते खेळत असलेल्या १५-२० जुगारींमध्ये पळापळ सुरू झाली. काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. या वेळी सुनील पवार व तांबापूर भागात राहणाऱ्या आणखी एका जुगाऱ्याने पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतु पळून जाण्यास जागा न मिळाल्यामुळे दोन जुगाऱ्यांनी थेट दुसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारली.


दुर्दैवाने गटारीत पडल्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. पवार याचा एक पाय फ्रॅक्चर झाला. पोलिसांनी दोघांना सिव्हिलमध्ये दाखल केले. पवार हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला काही वेळानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उडी मारणारे दाेन जण हे पाेलिस कारवाईशी संबंधित नव्हते, असा खुलासा सायंकाळी पाेलिसांनी केला. दरम्यान, पोलिस कर्मचारी संजय भालेराव यांच्या फिर्यादीवरून जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ११ हजार ८०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. पाटील नामक व्यक्तीचा हा क्लब असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच शहरातील गांधी मार्केट परिसरात भररस्त्यावर सुरू असलेला पत्त्याच्या क्लबवर प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने धाड टाकली होती. ठाकरे नामक व्यक्तीचा हा क्लब होता. या कारवाईस आठ दिवस होत नाहीत तोच बुधवारी जुने बसस्थानक परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. शहरात अवैध धंद्यांनी चांगलेच डोके वर काढले असल्याचे या घटनांमधून समोर येते आहे.

 

गुन्हा दाखल व जामिनावर सुटका
जुगार खेळणाऱ्या गणेश एकनाथ आकुल (वय ३४, रा.शिवाजीनगर), रफिक गुलमोहम्मद लोहार (वय ५०, रा.गेंदालाल मिल), अनिल प्रताप नेतले (वय ४३, रा.सिंगापूर, कंजरवाडा), शरीफ गुलमोहम्मद लोहार (वय ४९, रा.गेंदालाल मिल), सचिन जयराम सपकाळे (वय २९, रा.शनिपेठ) व सूर्यकांत वसंत शिंपी (वय ४३, रा.जैनाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वेळानंतर हात बॉन्डवर त्यांचा जामीन करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...