आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून शेजाऱ्यांनी विधवा महिलेस राॅकेल टाकून पेटवले, महिला अत्यवस्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घराच्या शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत चाैघांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या अंगावर राॅकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ७५ टक्के भाजली असून तिच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू अाहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी मध्यरात्री २ वाजता शिरसाेली येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दाेन जणांना अटक करण्यात अाली अाहे. 


वंदना रवींद्र महाजन (वय ४०, रा.शिरसोली) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. वंदना ह्या विधवा असून त्यांची विवाहित मुलगी यावल येथे राहते. तर मुलगा पुणे येथे खासगी नोकरी करतो. त्यामुळे वंदना ह्या शिरसोली येथे एकट्याच राहतात. त्यांच्या शेजारी राहणारे अंबादास सीताराम महाजन त्यांच्या पत्नी वर्षा अंबादास महाजन, सुभाष रामभाऊ महाजन व रेखा महाजन (सर्व रा.शिरसोली) या चौघांनी बुधवारी रात्री १२ वाजेपासून वंदना यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. वंदना यांच्या चारित्र्यावर संशय घेत चौघांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. हा वाद मिटल्यानंतर रात्री २ वाजता पुन्हा चौघांनी वंदना यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. वंदना यांनी दरवाजा उघडताच पुन्हा चौघांनी त्यांना मारहाण केली. शिवीगाळ करीत चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर वर्षा व रेखा महाजन यांनी वंदना हिस पेटवून द्या, असे चिथावले. त्यानुसार सुभाष महाजन याने सोबत आणलेल्या कॅनमधील रॉकेल वंदना यांच्या अंगावर ओतले. तर अंबादास याने काडीपेटीने वंदना यांना पेटवले. 


अंगावर रॉकेल टाकलेले असल्यामुळे वंदना यांच्या साडीने भडका घेतला. अंगास चटके बसत असताना त्या घरातून बाहेर पडल्या. जमिनीवर पडून त्यांनी स्वत:स विझवण्याचा प्रयत्न केला; पण काही सेकंदांतच त्या ७५ टक्के भाजल्या गेल्या. पेटवून देणाऱ्या चौघांनी अत्यवस्थ अवस्थेत वंदना यांना मध्यरात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पहाटे पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी वंदना यांच्या जबाबावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


नांदेड येथे महिलेला विवस्त्र करून धिंड काढणाऱ्या १९ जणांना शिक्षा 
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला विवस्त्र करून धिंड काढणाऱ्या १९ आरोपींना जिल्हा न्यायालयाने गेल्या आठवड्यात कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आठ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. देशभरात गाजलेल्या या घटनेत न्यायालयाने दोषींना शिक्षा ठोठावून महिलेस न्याय मिळवून दिला. त्यानंतर आठच दिवसांत तालुक्यातील शिरसोली येथे वंदना महाजन यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन चौघांनी त्यांना पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 


पाेलिसांचा ताफा शिरसाेलीत पाेहचल्याने खळबळ 
मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे शिरसोली गावात खळबळ उडाली अाहे. पाेलिसांचा ताफा दिवसभर गावात चाैकशीसाठी थांबून हाेता. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध आढाव, सहायक निरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच बुधवारी सकाळपासून शिरसाेली येथील घटनास्थळासह जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. काही नागरिकांनी घटनेबाबत संताप देखील व्यक्त केला. 


रॉकेल कॅन, काडीपेटी, जळालेली साडी ताब्यात 
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अंबादास व सुभाष यांना अटक केली. तर वर्षा व रेखा ह्या बेपत्ता झाल्या होत्या. बुधवारी दुपारी शिंदे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तेथून रॉकेलची कॅन, काडीपेटी, वंदना यांच्या अंगावरील जळालेली साडी, रॉकेल मिश्रीत माती, असे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांना जबाब दिल्यानंतर वंदना यांची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. ७५ टक्के भाजल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...