आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहादा बंदला हिंसक वळण; पाेलिसांनी केला लाठीमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा - कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने गहू, हरभऱ्याची खरेदी करत असल्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. भाजी मार्केट बंद करण्यासाठी १०० जणांच्या टोळक्याने भाजी मंडईत धुडगूस घालत हातगाड्या उलटवल्या. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी तहसील कार्यालयाजवळ आंदोलकांनी उभारलेला मंडप काढून घेत उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले.    

 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापारी हरभऱ्याची खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले व सोमवारी बंदची हाक दिली. सकाळपासून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागातून दुपारी सव्वाबारा वाजता स्वाभिमानी संघटनेच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. त्यानंतर भाजी मार्केट बंद करण्यासाठी शंभर ते दीडशे जणांच्या टोळक्याने भाजी मार्केटमध्ये धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी काहींनी भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या उलथवल्या. भाजी मार्केट बंद करा अशा आरोळ्या मारत दगडफेक करण्यात आली. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहाेचले. या वेळी काहींनी महिलांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले.  व धुडगूस घालणाऱ्यांना ताब्यात घेतले.    

 

बातम्या आणखी आहेत...