आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थापा मारायचे काम अधिकाऱ्यांना चांगले जमते, जलसंधारण सचिव डवले यांच्याकडून कडक शब्दात हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जुलै-ऑगस्ट महिन्यात नाशिक येथील बैठकीत जलयुक्त शिवार अभियानाचा कालबद्ध कार्यक्रम ठरवून दिला होता. तरीही या योजनेंतर्गत कामांना प्रशासकिय मान्यता मिळवलेल्या नाहीत. इतके दिवस माशा मारल्या का?, चार महिने काय करत होते, काय बोंबा मारल्या ते सांगा?, कामांचा अभ्यास करता येत नाही का?, थापा मारायच्या एवढे काम चांगले जमते, काय मोकाट झालेत हे? अशा कडक शब्दात मृद व जलसंधारण, रोहयोचे सचिव एकनाथ डवले यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. डवले यांनी प्रश्नांची सरबत्ती करुन प्रशासकीय यंत्रणा हलवून सोडली. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून कार्यारंभ आदेशाची जानेवारी अखेर मुदत दिली. त्यानंतर ही सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


कारणे सांगण्याची एक विशिष्ट पद्धत
लघु सिंचन विभागाच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात अाला. या वेळी ४९४ कामांना प्रशासकीय मान्यता नाही हे पाहून डवले म्हणाले, कार्यारंभ आदेश का दिले नाहीत? नाशिक येथे जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या बैठकीत जलयुक्तचा कालबद्ध कार्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. ६०० कामांचे नियोजन का झालेले नाही? असा प्रश्न उपस्थित करुन आज आलो नसतो तर दोन महिन्यांनी हेच सांगितले असते. काय करत होता चार महिने? अशी विचारणा डवले यांनी केली. या वेळी जीएसटीमुळे द्विधा मन:स्थिती झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे थातुरमातुर उत्तर ऐकून डवले पुन्हा संतापले. कारणे सांगू नका, अधिकाऱ्यांकडे कारणे सांगायची विशिष्ट पद्धतच आहे. प्रत्येकजण १०० कारणे सांगतात. त्याची मोजदाद करायचीय काय? कामच न करणाऱ्याला हजार कारणे आहेत. मला मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागते, अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रशासकीय मान्यतेसाठी डिसेंबर अखेरची मुदत दिलेली होती. आता निविदांसाठी कमी मुदत देणार नाही, काम झाले नाही तर कारवाई करण्याचा इशारा यावेळी डवले यांनी दिला.

 

नाेटीस देण्याच्या सूचना
जलसंधारण विभागाने ३ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता न मिळवल्याबाबत डवले यांनी संताप व्यक्त केला. जलसंधारण विभागाचे अधिकारी नंदनवार यांना काय बोंबा मारल्या ते सांगा, कामांचा अभ्यास केला की नाही? थापा मारायचे काम चांगले जमते. माशा मारण्यासाठी नवीन स्ट्रक्चर दिले काय? काय मोकाट झालेत हे अधिकारी, यांना काहीच का कळत नाही? अशा शब्दात डवले यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांना कार्यालयातून बुकलेट आणण्यासही सांगितले. त्याचबरोबर नंदनवार यांना बेजबाबदार वर्तनाबाबत कारणे दाखवा नोटीस देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले.

बातम्या आणखी आहेत...