आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी प्रश्न: महिलांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर मातीचे मडके फोडून केला प्रशासनाचा निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- पालिकेतील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला असून आज साकाळी 11 वाजेच्या सुमारास महिलांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर मातीचे मडके फोडून प्रशासनाचा निषेध केला. तसचे तात्काळ पाण्याच प्रश्न निकाली काढावा यासाठी पालिका कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. 


गेल्या तीन वर्षांपासून शहरातील बाबुजीपुरा व संत रोहिदास नगर भागात कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच वारंवार निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने आज नागरिकांचा संतापाचा बांध फुटला आणि त्यांनी थेट पालिकेचेवर मोर्चा काढला. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने पाण्याची अत्यंत आवशकता असल्याचा मुद्दा देखील यावेळी नागरिकांनी मांडला.


शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी भगवान बाबुजीपुरा, खाटीक वाडा, संत रोहिदास नगर या भागात थेट पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच, पालिकेच्यावतीने सदर समस्या सोडवण्यासाठी तात्काळ पाईपलाईन पाहणी करिता पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र देवरे यांना पाठवण्यात आले आहे. खाटीक वाड्यामध्ये मुख्य पाईपलाईनच्या व्हाल जोडणीला काही नागरिकांनी विरोध केल्याने ही समस्या उद्भवली आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे आज झालेला उद्रेक पाहता पोलीस बंदोबस्तात जोडणीचे काम केले जाईल, असे नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांचे पती शरद कोळी यांनी सांगितले आहे.


आंदोलकांमध्ये शबाना बी फक्रुद्दीन, भारतीबाई डांबरे, शबनम बी, अनिता डांबरे, सरला सुरवाडे पाराबाई डांबरे, पल्लवी जंजाळे, अयुब खान, अश्फाक खान, अर्शद खान, शेख शकील, संजय सुरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येन प्रभाग क्रमांक 2 मधील महिला पुरुषांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...