आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओल्या कोळशाचा पुरवठा; राज्याच्या वीजनिर्मितीत ६ हजार मेगावॅट घट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- विदर्भातील संततधार पावसामुळे राज्यातील सातही आैष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना ओल्या कोळशाचा पुरवठा होत असून भुसावळ येथील दीपनगर केंद्रासोबतच राज्यातील सातही आैष्णिक वीज प्रकल्पातून वीज उत्पादन ६ हजार २६८ मेगावॅट ए‌वढे घटले आहे. तब्बल १० हजार १७० मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या महानिर्मितीच्या राज्यातील सातही केंद्रातून केवळ ३,९०२ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. 


उन्हाळ्यातील काही अंशी असलेली कोळसा टंचाई पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात दूर झाली. मात्र, गेल्या आठवड्यात विदर्भातील कोळसा खाणींच्या कार्यक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे भुसावळ औष्णिक केंद्रासह राज्यातील चंद्रपूर, कोराडी, नाशिक, पारस, परळी, खापरखेडा आदी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना ओला कोळसा मिळत आहे. महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मितीची स्थापित क्षमता १० हजार १७० मेगावॅट आहे. मात्र, ओल्या कोळशामुळे प्रत्यक्षात केवळ ३,९०२ मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. 


नाशिक, भुसावळचे जुने संच बंद
महानिर्मितीने घटलेली वीज मागणीमुळे जुने संच बंद ठेवले आहेत. नाशिक व भुसावळ येथील जुन्या संचांचा कोळसा खासगी कंपन्यांना आवंटीत करण्यात आला आहे. यासह परळी, खापरखेडा आदी ठिकाणचे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यात वीज मागणी कमी असल्याने या काळात या संचांचे देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करुन आगामी वीजमागणी अधिक होण्याच्या काळात ते सज्ज ठेवले जाणार आहेत. 


विजेची मागणी घटली 
पावसामुळे विजेची मागणीही घटली आहे. एप्रिल महिन्यात राज्यात विजेची मागणीचा उच्चांक होऊन ती २३ हजार ७०० मेगावॅटवर गेली होती, सध्या ही मागणी केवळ १५ हजार ९०० मेगावॅटवर आली आहे. मागणी ७ हजार ८०० मेगावॅटने घटल्यामुळे वीजनिर्मितीमध्येही कपात करण्यात आली आहे. 


दररोज २५ रॅक आवक 
राज्यातील वीजनिर्मिती संचांना दररोज ३२ ते ३५ रेल्वे रॅक अर्थात ५० मेट्रीक टन कोळसा आवश्यक असतो. किमान १४ दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक ठेवावा लागतो. सध्या केवळ २५ ते २७ रॅक कोळसा उपलब्ध होत आहे. १० ते १२ रॅकची तूट पंधरवड्यापासून सुरु आहे. सर्वच केंद्रांकडे १० दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. 


कॉम्पेक्ट कोळशाचा वापर 
ओल्या कोळशाची समस्या दरवर्षी निर्माण होते. मात्र, वीज केंद्रांकडे पूर्वीचा कोरडा व कॉम्पेक्ट केलेला कोळसा उपलब्ध असतो. यामुळे वीजनिर्मितीत अडचणी येत नाहीत. मुळात पावसाळ्यात मागणी कमी असते. त्यामुळे दीपनगरातूनही समाधानकारक वीजपुरवठा केला जात आहे. 
- आर. आर. बावस्कर, मुख्य अभियंता, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र 

बातम्या आणखी आहेत...