आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमळनेर- आज समाजात एकीकडे व्हाट्स अँप,फेसबुक ,ट्वीटर यासारख्या समाजमाध्यमांवर व त्यांच्या गैरवापरावर टीका होत असतानाच अनेक व्हाट्स अँप ग्रुपवर समाजात तेढ व अश्लीलता पसरविण्याच्या कारणामुळे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पण दुसरीकडे मात्र अमळनेर तालुक्यातील भास्करराव नाना पाटील (जानवेकर) यांनी 'पुनर्विवाह शोध' या व्हाट्सअप ग्रुप ने मराठा समाजात आदर्श घालून दिला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत पाच घटस्फोटितांचे विवाह घडवून आणले आहेत.
मराठा समाजात घटस्फोटित पुरुष व परित्यक्त्या स्रियांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. घटस्फोटानंतर त्यांचे जीवन अतिशय खडतर होते. आयुष्यभर त्यांना एकटेपणाचे जीवन व्यतीत करणे कठीण होऊन बसते. त्यांच्या अपत्यांचे जीवन अंधकारमय होऊन जाते. भावना, परिवार अशा बाबी त्यांचा कोंडमारा करतात. त्यांच्या या दुःखाची जाणीव अमळनेर पंचायत समितेचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहायक व चोपडा येथील रहिवासी भास्करराव नाना पाटील (जानवेकर) यांना झाली. नुकतीच दोन महिन्यांपूर्वी निवृत्तीनंतर आरामदायक जीवनाचा मोह टाळून त्यांनी आपला वेळ मराठा समाजासाठी सामाजिक कार्यासाठी वाहून दिला व 'पुनर्विवाह शोध' या व्हाट्स अप ग्रुपची निर्मिती केली. या व्हाट्सअॅप ग्रुपवर इतर कोणतेही मेसेजेस न पाठवता फक्त आणि फक्त घटस्फोटित व इच्छुक वधूवरांचे परिचय पत्रकेच पोस्ट करण्यात येतात. या ग्रुपवर नंतर एकमेकांना पसंत पडलेल्या स्थळांना व त्यांच्या पालकांना समोरासमोर बोलावून त्यांच्या संमतीने विवाह घडवून आणला जातो.
नुकताच या ग्रुप च्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील काळखेडे येथील शिक्षक तात्याभाऊ रामसिंग पाटील यांची घटस्फोटित कन्या भाग्यश्री व पातोंडा ता अमळनेर येथील शिवाजी ओंकार पवार यांचा सुपुत्र अतुल यांचा विवाह बडी बिजासनी माता मंदिर येथे घडवून आणला गेला. भाग्यश्री व वैष्णवी या तीच्या सात वर्षाच्या मुलीच्या पालनपोषणच्या जबाबदरीसह अतुलने तिचा स्वीकार केला. या विवाहामुळे भाग्यश्री, वैष्णवी, अतुल व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले आहे. या सर्वांनी मिळून विवाहानंतर ग्रुप ऍडमिन भास्करराव नाना पाटील यांचे आभार मानून सत्कार घडवून आणला. असे आतापर्यंत पाच विवाह त्यांनी घडवून आणले आहेत. याला अधिक चालना मिळावी व परित्यक्त्या महिलांचे प्रमाण कमी व्हावी या उद्देशाने पाटील हे काम करीत आहेत. अमळनेर पंचायत समितीत सेवेत असतांना सुद्धा स्त्री भ्रूणहत्या विरोधात जनजागरण करण्यासाठी मूळ अमळनेर तालुक्यातील रहिवासी भास्करराव पाटील यांनी स्वखर्चाने जागृतीपर पत्रके छापुन वाटली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.