आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या निधनानंतर माेलमजुरी, अंगणवाडीत काम करून 2 मुलांना बनवले इंजिनिअर अन‌् डाॅक्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लग्नानंतर अवघ्या सात वर्षांतच छाया भाेळे यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे दाेन लहानग्या मुलांची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. पण त्या न डगमगता माेठ्या हिमतीने उभ्या राहिल्या. मुलांना उच्च शिक्षण देऊन जबाबदार नागरिक बनवावे हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी जिद्दीने प्रवास सुरू केला. सकाळी अंगणवाडीत तर रात्री दवाखान्यात नर्सचे काम करून त्यांनी माेठ्या मुलाला इंजिनिअर तर लहान मुलास डाॅक्टर बनविले. माेठा मुलगा हा साेलापूर येथे डीडीअार म्हणून कार्यरत अाहे. छाया भाेळे यांचा अवघड पण इतरांना प्रेरणा देणारा प्रवास खरंच अादर्श असाच अाहे.

 

संसारात कठिण प्रसंग हे नेहमी दार ठाेठावत असतात; पण त्या प्रसंगांना हिंमतीने ताेंड दिल्यास त्यातून १०० टक्के ताेडगा निघताेच. हे जळगावातील छाया वासुदेव भाेळे यांनी प्रत्यक्ष अापल्या कार्यातून पटवून दिले अाहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील छाया यांच्या पतीचे १९८७ साली निधन झाले. त्या वेळी माेठा मुलगा तीन वर्षांचा तर लहान मुलगा दीड वर्षाचा हाेता. या वेळी छाया भाेळे यांनी माेठ्या हिमतीने मुलांना चांगले शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात माेल मजुरी करून त्यांनी संसाराचा रथ हाकलला. त्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये माँटेसरीचा काेर्स करून अंगणवाडीत रुजू झाल्या.


हे काम करून देखील पैशांची चणचण भासू लागल्याने त्यांनी १९९७ पासून डाॅ. रंजना बाेरसे यांच्याकडे रात्रपाळीला नर्स म्हणून काम सुरू केले. ग्रामीण भागातून शहरात अाल्यावर त्यांना अनेक कटू प्रसंगांनाही ताेंड द्यावे लागले; पण त्या कधी हरल्या नाही. दाेन्ही मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे यासाठी त्या सतत धडपडत हाेत्या. हे कळल्यानंतर मुलांना ए. टी. झांबरे शाळेच्या प्रणिता झांबरे, नेमीचंद भांडे यांनी मदतीचा हात व मार्गदर्शन दिले. दाेन्ही मुलांचे मू. जे. महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माेठ्या मुलाने जळगावातील शासकीय अभियांत्रिकीत इंजिनिअरिंगचे तर लहान मुलाने केएमला वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. अाज त्यांचा माेठा मुलगा इंजिनिअर कुंदन भाेळे हे साेलापूर येथे डीडीअार म्हणून कार्यरत अाहेत. तर लहान मुलगा चंदन भाेळे हे पुणे येथील ससून हाॅस्पिटलमध्ये अाॅर्थाेपॅडीक डाॅक्टर म्हणून कार्यरत अाहेत.

 

मुलांना वेळच देता अाला नाही
जेव्हा अवघड प्रसंग अाला तेव्हा अार्थिक पाठबळ नव्हते. एकवेळ वाटले की स्वत:ला संपवून टाकावे; पण मुलांच्या विचाराने मी मागे फिरली. त्यांना माेठे करायचे, चांगले शिक्षण द्यायचे हे स्वप्न पूर्ण झाले अाहे. सकाळी अंगणवाडी रात्री दवाखान्यात नाेकरी करत असल्याने मी फक्त ५ ते ६ तास घरी राहत हाेते. त्यामुळे मुलांकडे फार लक्ष दिले गेले नाही यांची खंत वाटते. मी घरी नसताना शेजारच्यांनी मुलांकडे लक्ष देेऊन मदत केली. मुलांनी देखील कुठल्याही गाेष्टीचा हट्ट न करता अाईच्या कष्टाची जाणीव ठेवत चांगले शिक्षण घेऊन समाजात माझी मान उंचावली. याचा मला अभिमान अाहे.
- छाया भाेळे

 

बातम्या आणखी आहेत...