आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चालकाला लागली डुलकी, नियंत्रण सुटल्याने ट्रक घरात शिरला; धरणगावात महिला ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव- चालकाला डुलकी लागल्यामुळे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या काठावरील घरात शिरला. त्यात झाेपेत असलेली महिला चिरडली गेली. तर तिचा मुलगा व सासू गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि.२७) पहाटे ४.३० वाजता धरणगाव शहरातील पाराेळा नाक्यावरील भिल्ल वस्तीजवळ घडली. घटनेनंतर चालक ट्रक साेडून पसार झाला.

 
धरणगाव शहरातून चाेपड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाराेळा नाका परिसर अाहे. येथील रस्त्याच्या काठावर चार ते पाच फूट अंतरावर सरळ रांगेत रहिवासी घरे अाहेत. शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून ट्रक (क्रमांक एमएच १९ बीए ०५७३) रस्त्याच्या काठावरील एका घरात शिरला. त्यात घराची भिंत काेसळून व चाकाखाली अाल्याने झाेपेत असलेल्या रेखाबाई संजय भील (वय ३७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा अानंद संजय भील व सासू सावत्राबाई सुखराम भील हे दाेघे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव जिल्हा सामास्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात अाले. अपघात घडल्यानंतर चालक ट्रक साेडून पसार झाला. त्याच्या विराेधात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३८, ४२७ माेटार व्हइकल अॅक्ट १८४, १३४ ब प्रमाणे धरणगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. तपास एपीअाय पी. के. सदगीर हे करीत अाहेत. पाेलिसांनी घटनास्थळावरून ट्रक ताब्यात घेऊन ताे पाेलिस ठाण्यात जमा करण्यात अाला अाहे. 


मृत्यूने गाठले झाेपेत 
ट्रकने ज्या मातीच्या घराला धडक दिली त्या ठिकाणी रेखाबाई भील या गाढ झाेपेत हाेत्या. काही कळण्याच्या अात त्यांच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने पहिल्या घराला धडक देताच भिंत काेसळली. त्या ढिगाऱ्यात चाक रुतल्याने ताे पुढे सरकला नाही. अन्यथा, शेजारील अन्य घरांतही हा ट्रक शिरून अाणखी जीवितहानी झाली असती. 


भाजप तालुकाध्यक्ष संतप्त 
अपघाताची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, नगरसेविका संगीता गुलाब मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. धरणगावातून जाणाऱ्या चाेपडा रस्त्यावर वर्दळ असते. अपघात ज्या ठिकाणी झाला तेथून जवळच महिलांचे सार्वजनिक शाैचालय अाहे. जीव धाेक्यात घालून महिलांना रस्ता अाेलांडून तेथे जावे. पालिकेने ठाेस उपाययाेजना कराव्या, असे महाजन यांनी सांगितले. 


रेखाबाई भील हाेत्या मेहनती 
ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या रेखाबाई भील या मेहनती हाेत्या. माेलमजुरी करून त्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायच्या. शुक्रवारी नियतीने घात केला. त्यामुळे एकुलच्या मुलाचे मातृछत्रही हरपले अाहे. 


पतीचा दाेन वर्षांपूर्वी मृत्यू 
ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या रेखाबाई भील यांच्या पतीचा दाेन वर्षांपूर्वी शेतात मळणी यंत्राच्या चाकाखाली अाल्याने मृत्यू झाला हाेता. त्यामुळे मुलगा अानंद याचे अाधी पितृ व अाता मातृछत्र हरपले. ताे गंभीर जखमी असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले. घटनेची माहिती मिळताच शेकडाे नागरिकांनी घनास्थळी धाव घेऊन घेतली. 


रस्त्यावर दुभाजक हवे 
रस्त्यावरील वाढलेली वर्दळ डाेळ्यासमाेर ठेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दुभाजकांचा प्रश्न मार्गी लावावा. रस्त्याच्या दुतर्फा जी घरे अाहेत ती लक्षात घेऊन उपाययाेजना कराव्या. रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी. शक्य असेल तेथे गतीराेधक टाकावे. अाठवडाभरात या प्रश्नांवर जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाेस पाऊल उचलावे. अन्यथा, तीव्र अांदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका संगीता मराठे यांनी दिला.  

बातम्या आणखी आहेत...