आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोहल्यावर चढण्यापूर्वी पाणी बचतीसाठी ८ जोडप्यांचे श्रमदान; ठाणेपाड्यात सामूहिक विवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- तालुक्यातील ठाणेपाडा येथे सामूहिक विवाह सोहळा झाला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या आठ जोडप्यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमदान करीत पाणी अडवा-पाणी जिरवा असा संदेश दिला. या उपक्रमातून वधूवरांनी समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला. दरम्यान, नागरिकांचा वेळ व पैसा वाचावा यासाठी सामूहिक सोहळा झाला. या सोहळ्यावर केवळ एक लाख ७५ हजार रुपये खर्च झाले. 


तालुक्यातील ठाणेपाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सामूहिक विवाह सोहळा झाला. या सोहळ्यात आदिवासी कोकणी समाजातील आठ जोडपी विवाहाच्या रेशीम गाठीत बांधले गेले. विवाह सोहळ्यासाठी गेल्या महिनाभरापासून सरपंच भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू होती. विवाह सोहळ्यापूर्वी सकाळी नवरदेवांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूवरांनी हातात टिकाव, फावडी घेत अर्धातास श्रमदान केले. या वेळी आमदार अॅड. के.सी. पाडवी, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, आदिवासी शबरी विकास महामंडळाचे माजी आयुक्त टी.के. बागुल, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद विभागाचे उपायुक्त यशवंतराव पवार, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवमन पवार, सरपंच भारती देवमन पवार, उपसरपंच काशिनाथ पवार, नगरविकास विभागाचे सहसचिव प्रभाकर पवार, पंचायत समिती सदस्य देवमन चौरे, पाणी फाउंडेशनचे सुखदेव भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरत पाटील, शेतकी संघाचे बी.के. पाटील, डॉ. सयाजी मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, ग्रामसेवक विजय होळकर, सुरेश पवार उपस्थित होते. 


सिने अभिनेता अमिर खान तसेच सत्यजित भटकळ यांच्या पुढाकाराने दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ठाणेपाडा गाव सहभागी झाले आहे. या स्पर्धेला बळ मिळावे तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वधूवरांसह वऱ्हाडींनी हातात टिकाव, फावडी घेत श्रमदान केले. गावात रोज सकाळी ७ ते १० या वेळेत श्रमदान करण्यात येत आहे. गावागावात जलसंधारणाच्या कामांनी वेग घेतला आहे. 


उत्तरकार्यानंतर श्रमदान 
नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले गावातील भागाबाई काळे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. काळे कुटुंबाने आईच्या स्मरणार्थ श्रमदान केले. आईच्या निधनामुळे दहा दिवसांपासून श्रमदान करता न आल्याने काळे कुटुंबाने आईच्या उत्तरकार्याच्या दिवशी नातेवाइकांसोबत श्रमदान करण्याचा निर्णय घेत श्रमदान केले. या गावाचा जलयुक्त शिवार अभियानातही समावेश झाला आहे. १ मे रोजी नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावासह जिल्ह्यात ८५ गावांत महाश्रमदान होणार आहे. 


सामाजिक बांधिलकीतून उपक्रम 
ठाणेपाड्यातील आठही तरुणांचे लग्न आर्थिक परिस्थितीमुळे लांबणीवर पडत होते. गेल्या दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा बेत आखण्यात आला होता; परंतु पैसा नव्हता. त्यामुळे लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात येत होत्या. सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना पुढे आली. ग्रामस्थांनी विवाह सोहळ्यासाठी निधी जमा केला. अवघ्या एक लाख ७५ हजार रुपयात आठ जोडप्यांचे लग्न लागले. 
-देवमन पवार, सामाजिक कार्यकर्ते, ठाणेपाडा

बातम्या आणखी आहेत...