आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - 'ती मला बोलावतेय, तिला जिथे जाळले, तिथेच मला जाळा अन् तिच्या राखेत माझी राख मिसळा... द एंड', असा भावना विभोर, हृदयस्पर्शी संदेश मित्रांना टाकून विरहाने व्याकुळ झालेल्या तरुणाने स्वत:च्या अंगातील शर्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री घडली. मूजे महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या या तरुणाचे एका मुलीवर प्रेम होते. तिने आत्महत्या केल्यामुळे त्यानेही आशाबाबानगरातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
विशेष म्हणजे मुलीने आत्महत्या केल्यानंतर आपला मित्र वैफल्यग्रस्त झाला आहे, हे लक्षात आल्यानंतर त्याच्या जीवलग मित्रांनी त्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु मित्रांच्या हृदयाला चटका लावून तो जगातून निघून गेला. त्यामुळे या घटनेत मित्र प्रेमाचाही प्रत्यय आला. प्रदीप युवराज ठाकरे, (वय २१, रा.सुटकार,ता.चोपडा ) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूजे महाविद्यालयात बीएसस्सी व्दितीय वर्षात शिक्षण घेत होता. युगंधर बऱ्हाटे (रा.तरसोद ) या मित्रासोबत तो गणेश कॉलनीत भाड्याच्या खोलीत वास्तव्य करून होता.
त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीपचे एका मुलीवर प्रेम होते. त्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे तो कमालीचा दुखावल्याने वैफल्यग्रस्त झाला हाेता. मित्रांना ही घटना माहित असल्यामुळे त्यांनी त्याला धीर दिला हाेता. तसेच चोपडा येथील त्याचे मित्र गजानन पाटील, स्वरजित दुसाने, चेतन पाटील हे जाफराबाद येथे पेपर देण्यासाठी चालले होते. त्यांना प्रदीप नैराश्यात असल्याचे कळले होते. त्यामुळे ते गुरुवारी जळगाव येथे त्याला भेटण्यास आले होते. दुपारी ३ वाजता त्यांची भेट झाली. त्यानंतर ते त्याच्या गणेश कॉलनीतील खोलीवर गेले होते. सायंकाळी त्याने मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये जेवणही केले.
नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
मित्रांनी त्याला समजावले. हास्यविनोद करून त्याच्या विरहाचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी गप्पा मारल्या. त्या वेळी तो मात्र त्यांच्याशी फारसे बोलत नव्हता. रात्री १२ वाजेच्या सुमारास 'बाहेरून थुंकून येतो', असे मित्रांना सांगून तो खोलीबाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. त्यामुळे मित्रांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा मोबाइल बंद येत होता. रात्रभर शोधाशोध करूनही प्रदीप न सापडल्याने मित्र हताश झाले होते. अखेर शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आशाबाबानगरातील रेल्वे रुळांजवळील कडुलिंबाच्या झाडावर एका तरुणाचा मृतदेह लटकलेला स्थानिक नागरिकांना आढळून आला. तो प्रदीपचा मृतदेह होता. त्याने स्वत:च्या अंगातील शर्ट काढला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात अतुल बारी यांनी या घटनेबाबत रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रामानंदनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्याच्या खिशात असलेल्या मोबाइलच्या आधारे संपर्क केल्यानंतर त्याची ओळख पटली. त्यानंतर मित्र व त्याचे वडील युवराज ठाकरे हे घटनास्थळी पोहोचले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. या वेळी त्याच्या वडिलांसह मित्रांनी आक्रोश केला. शवविच्छेदननंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयातून सुटकार येथे रुग्णवाहिकेने नेला. प्रदीपच्या पश्चात आईवडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील युवराज ठाकरे हे एस.टी.महामंडळात वाहक आहेत.
'मला ती बोलवत आहे...'
भाऊ गमवायचे काहीच नव्हते, पण गमावलं. मला ती बोलवत आहे. भाऊ...ती मेली तेव्हापासून तिला पाहून पाहून रडत होतो. पण, मी तुम्हाला सांगितले नाही. ती मला बोलवत होती. भाऊ, आता शेवटची इच्छा... मला तिथेच गाडसाल, जिथे माझ्या सोनाला गाडली किंवा जाळले आहे आणि माझी राख पण तिच्यात मिक्स करसाल, बस एवढी शेवटची इच्छा... पवनला त्याचा १२ वाजून ४८ मिनिटांनी शेवटचा संदेश आला. मात्र, पवनने हे संदेश शुक्रवारी सकाळी बघितले. त्यानंतर पवनने शुक्रवारी ६ वाजून २९ मिनिटांनी भाऊ, तू कुठे आहेस. माझ्याकडे पाहून तरी परत ये, असा संदेश प्रदीपला पाठवला. तोपर्यंत फार उशीर झालेला होता.
मित्रांकडून रात्रभर शोध
प्रदीपने भुसावळ रेल्वेत खलाशी असलेल्या पवन फेगडे व इतर मित्रांना सोशल मीडियावर संदेश टाकले. त्यानंतर त्याच्या मित्रांच्या हृदयातच धडकी भरली. सर्वजण घाबरून गेले. त्यांनी या प्रकाराबाबत इतर िवद्यार्थी मित्रांनाही सांगितले. रात्रभर त्याचे मित्र रेल्वेरुळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक व इतरत्र त्याचा शोध घेत होते. त्याने पवन याच्या व्हॉट्सअॅपवर मध्यरात्री १२ वाजून ४६ मिनिटांनी संदेश टाकले. अखेरचा संदेश मध्यरात्री १२ वाजून ४८ मिनिटांचा होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.