आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: बिलाडी येथील तरुण शेतकर्‍याची विहीरीत उडी मारुन अात्महत्या, गावावर शोककळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापडणे (धुळे) - तालुक्यातील बिलाडी येथील एका तरुण शेतकर्‍यांने काल (गुरूवारी) रात्री 8 वाजता विहीरीत उडी मारुन अात्महत्या केली. मनोहर धोंडू जाधव (38) असे या शेतकर्‍याचे नाव अाहे. स्वत:ची जमीन नसल्याने ते गेल्या 5-6 वर्षापासून दुसर्‍याच्या शेतात राबत होते. तरीही हातात काहीच राहत नसल्याने अालेल्या नैराश्यातून त्‍यांनी आपला जीवनप्रवास संपविल्याची माहिती आहे. तरुण शेतकर्‍याच्या अशा अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.


बिलाडी येथील मनोहर धोंडू जाधव (वय ३८) यांच्याकडे स्वत:ची जमिन नसल्याने ते दुसर्‍याची शेती कसत. सलग तीन वर्षापासुन पडणारा दुष्काळ, गेल्या वर्षी झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावाने हाता-तोंडाशी अालेला घास हिरावला गेल्यानंतरही जाधव कुटुंब नव्या उमेदीने नशिबाशी लढु लागले होते. अाधीच डोक्यावर कर्जांचा डोंगर असतांनाही शेतीसाठी त्‍यांनी यंदाच्‍या पीकपेरणीसाठी आणखी कर्ज घेतले होते. मात्र यावर्षीचाही निसर्गाचा लहरीपणा मनोहर जाधव यांना चिंताग्रस्त करत होता.


अखेर काल (दि.५) संध्‍याकाळी त्यांनी बिलाडी-धुळे रस्त्यावरील एका विहीरीत अात्महत्या केली. एका ग्रामस्थाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी अारडा-ओरड केली व कुटुंबीयांना कळविले. ग्रामस्थांनी धावपळ करून शर्थीचे प्रयत्न केल्‍यानंतरही त्‍यांना बाहेर काढता आले नाही. अखेर अापत्ती व्यवस्थापन विभागाला पाचारण करून त्‍यांना बाहेर काढण्‍यात आले. परंतू तोपर्यत त्यांचा जीवनप्रवास संपला होता.

 

त्यांच्यावर खाजगी स्वरुपातील कर्ज असल्याची माहिती आहे. त्‍यामुळे नापिकी व कर्जबारीपणाच्या विवंचनेत ही अात्महत्या झाल्याने शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी आता होत अाहे. मनमिळावू व साधा स्वभावाच्या या शेतकर्‍याच्या अात्महत्येने गावावर शोककळा पसरली अाहे. त्यांच्यामागे अाई, वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...