आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमधील जानकीनगरात अग्नितांडव; 22 घरे खाक, सिलिंडरचाही झाला स्‍फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानकीनगरात लागली भीषण अाग विझवण्यासाठी धावपळ करताना नागरिक अन‌् खाक झालेली घरे. - Divya Marathi
जानकीनगरात लागली भीषण अाग विझवण्यासाठी धावपळ करताना नागरिक अन‌् खाक झालेली घरे.

जळगाव - जानकीनगर-तुकारामवाडीत गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता एका बंद घरात देवापुढे लावण्यात अालेल्या दिव्यामुळे अाग लागली. त्यानंतर शॉर्टसर्किट झाल्याने अागीने रुद्रावतार धारण केला. तितक्यात सिलिंडरचादेखील स्फोट झाल्याने हाहाकार उडाला. त्यामुळे नागरिक जीव मूठीत घेऊन पळत सुटले तर काहींनी अाग विझवण्यासाठी धडपड केली.

 

या भीषण आगीत मनपाच्या जागेवरील २२ पार्टिशनची घरे व १ अंगणवाडी खाक झाली. तसेच घरांमधील दागिने, मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे, धान्य, संसाराेपयाेगी साहित्य, घरगुती उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. तब्बल दीड तासानंतर (दुपारी १.१५ वाजता) आग आटोक्यात आल्यानंतर २२ कुटुंबांमधील ५७ बाधितांच्या मदतकार्यासाठी लोकप्रतिनीधींबरोबर नागरिकही सरसावले अाहे.

 

जानकीनगर-तुकारामवाडी परिसरात गुरुवारी सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थ केंद्रापासून समर्थांची पालखी निघाली होती. या पालखीमध्ये या परिसरातील महिला व नागरिक सहभागी झाले होते. बहुतांश घरे बंद होती. सकाळी ११.४५ वाजता उमाकांत विठ्ठल महाजन यांच्या घरात देवापुढे ठेवलेल्या दिव्यामुळे आग लागली. त्यामुळे शाॅर्टसर्किट झाल्याने आगीने माेठा भडका घेतला. थोड्याच वेळात घरात असलेल्या सिलिंडरचादेखील अागीमुळे स्फोट झाला. या स्फोटामुळे नागरिकांची पळापळ सुरू झाली. तर अागीमुळे या भागातील वीज प्रवाह खंडित करण्यात आला. या घराच्या बाजूलाच असलेली घरे पार्टिशनची असल्याने आगीने तीव्र भडका घेतला. त्यामुळे एक-एक करता ककरता २२ घरे व १ अंगणवाडी भस्मसात झाली. नागरिक घरांची पत्रे काढून घरातील साहित्य आगीतून वाचवण्याचा प्रयत्न करत होते.


डोळ्यासमोर घर जळताना पाहून आक्रोश
घराला लागलेली आग पाहून लहान-थोर एकमेेकांच्या गळ्यात पडून रडत होते. गर्दी झाल्यामुळे पोलिस जमावाला पांगवत होते. अागीमुळे आजूबाजूच्या घरांमधील २० ते २५ सिलिंडर बाहेर काढून इतरत्र नेण्यात आली. दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली.

 

पेट घेतलेले सिलिंडर फेकले बाहेर
आग लागल्यानंतर या परिसरातील नागरिक मदत कार्यासाठी सरसावले हाेते. हातात सापडेल ते भांडे घेऊन नागरिक आग विझवण्याचा तसेच आगीतून साहित्य वाचवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, आगीमध्ये पेट घेतलेले एक सिलिंडर नागरिकांनी पाण्याने विझवून घराबाहेर काढले. सर्व घरे एकमेकांना जोडून असल्याने आगीचा भडका वाढतच होता. स्वत:चे घर जळताना पाहून माया महाजन ही महिला घटनास्थळीच बेशुद्ध झाली होती. त्यांना खाटेवर टाकून रुग्णालयात नेत असताना त्या शुद्धीवर अाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा आक्रोश करायला सुरुवात केली. घरावरील पत्रे काढताना एका युवकाच्या व पोलिसाच्या हाताला इजा झाली आहे.

 

पाण्याच्या टँकरसाठी पैसे : अाग लागलेली घरे ही निमुळत्या गल्ल्यांमध्ये असल्याने तेथपर्यंत महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब जाण्यास अडचणी येत हाेत्या. त्यामुळे परिसरातील युवकांनी थेट काशीबाई उखाजी शाळेजवळील काळे नामक खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या टंॅकरचालकाकडे धाव घेतली. त्याठिकाणी संबंधिताने पैसे असेल तरच टंॅकर येईल, असे सुनावल्याने नाराजी व्यक्त करण्यात अाली. दरम्यान, धुराचे लाेळ उठून व अागीच्या डाेंबमुळे अनेक घराबाहेरील पाण्याच्या टाक्या व प्लास्टिकच्या खुर्च्या वितळून गेल्या.

 

अागीच्या लाेळांमुळे उपचार थांबवले : अागीच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर राहत असलेल्या श्रीराम जयराम पाटील (वय ६५) या वृद्धाला घराबाहेरील पलंगावर झेपावून सलाइन लावण्यात अालेली हाेती. धुरामुळे त्यांच्यावरील उपचार थांबवून त्यांना दुसऱ्यांच्या पक्क्या घरामध्ये हलवण्यात अाले.

 

आग बाधितांना मदतीचा ओघ : आगीच्या घटनास्थळी आमदार सुरेश भोळे यांनी भेट देऊन नागरिकांना धीर दिला. त्यानंतर स्वामी समर्थ केंद्रात जमलेल्या सर्व महिला व नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. जळालेली सर्व घरे जशी होती तशी बांधून देण्यात येतील. पंचनामा झाल्यानंतर शासकीय मदत मिळवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. शुक्रवारी घटनास्थळ स्वच्छ करून काम सुरू करण्यात येईल. तसेच भोळे यांनी महिलांना ३० साड्याही दिल्या व भोजनाचीही व्यवस्था केली. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी रेडक्रॉसच्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्याची सूचना केली. बाधितांसाठी मंडप टाकून ६० चादरी देण्यात आल्या. अापत्तीग्रस्त कुटुंबीयांनी स्वामी समर्थ केंद्राचा आसरा घेतला आहे. तेथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्यासाठी शहरातील इतर नागरिकही सरसावले आहेत.


या नागरिकांची जळाली घरे
पंडित मांगो चौधरी, दत्तात्रय इच्छाराम पाटील, पांडुरंग रामकृष्ण कापडे, शेनफडू चौधरी, विठ्ठल महाजन, सोनू मांगो चौधरी, येडाबाई लक्ष्मण मराठे, फकिरा तुकाराम चौधरी, विजय मराठे, दिलीप मराठे, प्रभाकर भिका महाजन, संजय गणपत पाटील, चंद्रकला राजेंद्र चौधरी, राजेंद्र एकनाथ चौधरी, दिलीप काशीनाथ पाटील, भिका पुना महाजन, राहुल महाजन, शांताराम एकनाथ चौधरी, संगीता नवनीत शिंपी, लक्ष्मीबाई वीजू सुरवाडे, काशीनाथ लक्ष्मण सरदार.

 

 

 

पुढील स्‍लाइडवर...आगीत कागदपत्रे, पैसे, दागिन्यांसह स्वप्नांची राख...

 

बातम्या आणखी आहेत...