आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव- देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे घरात आगीचा भडका उडताच शेजारच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मजूर कुटुंबीयांच्या १२ झोपड्यांची राखरांगोळी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी दालफड परिसरात घडली. विशेष म्हणजे आग लागल्याचे कळताच शेजारच्या कुटुंबातील महिलेने आपल्या सून आणि पाच वर्षांच्या चिमकुल्या नातवासह बाहेर तत्काळ बाहेर पळ काढल्याने ते बचावले. हे तिघे बाहेर पडताच शेजारच्या आगीने त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्याशिवाय परिसरातील झोपड्यांमधील बहुतेक कुटुंबिय कामासाठी सकाळीच बाहेर पडल्याने एवढ्या भयंकर आगीत सुदैवाने जिवीत हानी झाली नाही अथवा दुखापतही झाली नाही. दरम्यान, ४१ दिवसांपूर्वी जानकीनगर, तुकारामवाडी परिसरात बंद घरात देवापुढे लावलेल्या दिव्यामुळे अाग लागून गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने १५ घरे जळून खाक झाली हाेती. या घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी सकाळी ९.३० वाजता शिवाजीनगर भागातील भुरे मामलेदार प्लाॅटमधील दालफड परिसरात झाली.
भुरे मामलेदार प्लॉटमध्ये सतीश कंडारे यांच्या मालकीच्या १२ पार्टिशनच्या झोपड्या होत्या. यात ११ मजूर कुटंुब वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी घरातील पुरुष व महिला कामावर गेलेले हाेते. त्यामुळे बहुतेक घरे बंदच होती. या ठिकाणचे रहिवासी रेल्वे गाड्यांमध्ये कुलूप, चेन दुरुस्तीचे काम करणारे चेतन भगत हे देखील सकाळी घराचे बाहेर पडताना देवपूजा करून व देवापुढे दिवा लावून गेले होते. काही वेळानंतर दिव्यामुळे भगत यांच्या घराला आग लागली. (असा अंदाज आगग्रस्त कुटंुबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे) त्यामुळे भगत यांच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजारी राहणाऱ्या मंगलाबाई चंद्रकांत अाटोळे यांना दिसले. त्यांनी लगेच सून व पाच वर्षांचा नातू ओम यांच्यासोबत घराबाहेर पळ काढला. त्यांच्या शिवाय इतर झोपड्यांमध्ये असलेल्या दोन-तीन जणांनी देखील बाहेर येऊन मोकळ्या जागेचा आश्रय घेतला. काही मिनिटांतच आगीने राैद्ररुप धारण केले. आगीमुळे आटोळे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. आगीचा मोठा लोळ आकाशात पसरला होता. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. तर सून व नातूस बाहेर घेऊन आलेल्या मंगलाबाई आटोळे यांना ग्लानी आल्याने त्या जमिनीवर काेसळल्या. त्याच वेळी काही नागरिकांनी अापल्या घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढल्यानेे माेठा अनर्थ टळला. आगीत आटोळे यांच्यासह चेतन भगत, रोहिणी सोनार, विष्णू कोळी, गुलाब शेख, संजय मिस्तरी, रफीक शेख, शारदा बिऱ्हाडे, ज्ञानेश्वर पाटील, संजय आटोळे व शैलजा विसपुते यांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात प्राणहाणी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. तब्बल २.३० तासांनंतर अग्निशामक दलाच्या ३ बंबांनी आग आटोक्यात आणली. तर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश जानकर यांच्यासह पथकाने मदत केली.
युवाशक्ती, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे मदत
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता युवाशक्ती आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे आगग्रस्त कुटंुबियांना मदत केली. यात गहू, तांदूळ, साखर, चहा, लोणचे, कपडे व भांड्यांचा समावेश हाेता. धर्मरथ फाऊंडेशनकडून ८ दिवस दोन्ही वेळ जेवण, आरंभ प्रतिष्ठान व गणेश क्रीडा सांस्कृतिक मंडळामार्फत संसारोपयोगी साहित्य वाटप केले. बुधवारी शिवसेनेच्या पदाधिकारी मंगला बारी, समाजवादी पार्टीचे डॉ.रागीब अहमद हे मदत करणार आहेत.
तहसीलदारांकडूनच पंचनामा : तहसीलदार अमोल निकम यांनी दुपारी घटनास्थळी जाऊन पंचानामा केला. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा धनादेश लवकरात लवकर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तरुणांच्या हिमतीमुळे माेठा अनर्थ टळला
आगीची घटना कळताच परिसरातील सुनील चोरट, कुंदन पाटील, नीलेश भागेश्वर, अजय जगताप, बाबा लोहार, वाल्मीक वाघ, विशाल वाघ यांच्यासह अन्य तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुरुवातीला त्यांनी आग लागलेल्या घरातील लोकांना बाहेर काढले. त्यानंतर सर्व घरांमधील गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर तीन गॅस सिलिंडर हे पूर्णपणे आगीत पडून असल्यामुळे बाहेर काढता आले नाही; पण सुदैवाने या सिलिंडरांना गळती न लागल्यामुळे स्फोट झाला नाही.
दुर्घटना टाळण्यासाठी, ही घ्या काळजी
घराबाहेर जाताना देवापुढे दिवा पेटता साेडून जाऊ नका.
बाहेर जाताना किंवा रात्री सिलिंडरची कॅप फिरवून गॅस बंद करावा.
सिलिंडर शेगडी, स्टोव्ह, रॉकेलच्या डब्याजवळ ठेऊ नये.
हिटर, ओव्हन अाणि फ्रीज अादी उष्णता निर्माण करणारी उपकरणे सिलिंडर ठेऊ नये.
वीज वायर, बटण, प्लग पॉइंटपासून एक मीटर लांब सिलिंडर ठेवा.
अग्निशामक दलाचे बंब पोहाेचले उशीरा
सकाळी ९.३० वाजता आग लागल्यानंतर घटनास्थळी सकाळी १० वाजता मनपाच्या अग्निशामक विभागातील पहिला बंब घटनास्थळी आला. हा बंब शिवाजीनगर भागातच उभा असल्यामुळे लवकर पोहचला. त्यानंतरचे दोन बंब खूप उशीराने आले. शिवाजीनगर उड्डाणपुलावर क्रॉस बार बसवण्यात आल्यामुळे अग्निशामक दलाच्या बंबांना गुजराल पेट्रोलपंपाकडून घटनास्थळ गाठावे लागले. याशिवाय अग्निशामक बंबांचा पाइप गळका असल्यामुळे देखील मोठ्याप्रमाणात पाण्याची नासाडी झाली.
अागग्रस्ताना इतर नागरिकांनी दिला धीर
आगीत संपूर्ण घर खाक झाले. संसारोपयोगी वस्तूंची डाेळ्यासमाेर राखरांगोळी झाल्यामुळे आगग्रस्त कुटंुबीयांना अश्रू अनावर झाले होते. परिसरातील नागरिकांनी त्यांना माेठा धीर दिला. मंगलाबाई अाटाेळे यांच्या घरात सुमारे १२ हजार रुपयांची रोकड होती, ती देखील आगीत जळून गेली.
जानकीनगरातील घटनेची अाठवण
जानकीनगर-तुकारामवाडीत १ फेब्रुवारी राेजी एका बंद घरात देवापुढे लावण्यात अालेल्या िदव्यामुळे अाग लागली हाेती. त्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाल्याने हाहाकार उडाला. त्यामुळे १७ पार्टिशनची घरे खाक झाली हाेती. या घटनेची अनेकांना मंगळवारी अाठवण झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.