आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव - मनपात बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ मजुरांना बेकायदा व नियमबाह्यरीत्या अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिल्याचा प्रकार घडला अाहे. नियुक्ती झालेल्या व नियुक्तीस जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार नगरसचिव विभागातील संशयित लिपिक विलास निकम यांच्याविरोधात बडतर्फीची अंतिम नोटीस बजावली असून याप्रकरणाची चौकशी करुन पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अास्थापना अधीक्षकांना दिले अाहेत.
मनपाच्या पाणीपुरवठा विभागात हेल्पर व मजूर या पदांवर नियुक्ती दिल्याचा प्रकार घडला असून यातील नाेकरी मिळवलेले व नियुक्तीसाठी प्रक्रिया राबवणारे अधिकारी, कर्मचारी, अायुक्त किशोर राजेनिंबाळकर यांच्या रडारवर अाहेत. सन २००५ च्या ठराव क्रमांक ७० मध्ये ३५ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये वारस असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रांच्या अाधारे सेेवेत सामावून घेण्यात अाले अाहे. सध्या हे कर्मचारी पालिकेत सेवेत असून त्यांच्यावर झालेला पगाराचा खर्च वसूल करण्याच्या दृष्टीने नोटीस बजावण्यात अाली अाहे.
असे अाहे प्रकरण
केस नंबर १ : हेमंत नारायण सपकाळे यांना अनुकंपा तत्वावर बेकायदा नियुक्ती देण्यात अाली अाहे. सपकाळे यांच्या नियुक्तीबाबतचे मूळ कोणतेही कागदपत्रे पालिकेच्या दस्तएेवजात आढळून येत नाही. ३५ मृत कर्मचाऱ्यांचे वारसांच्या यादीत सपकाळे यांचे नाव समाविष्ट नसल्याचे दिसून येते. खाेटी माहिती व कागदपत्रांच्या अाधारे हेमंत सपकाळे यांना पाणीपुरवठा विभागात हेल्पर व मजूर या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अायुक्तांनी पालिकेच्या अास्थापना अधीक्षकांना या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे व दस्तावेजचा सात दिवसांत शाेध घेण्याचा आदेश केला अाहे.
केस नंबर २ : पाणीपुरवठा विभागाच्या शेड्युलवर भास्कर वासुदेव काेळी यांना हेल्पर, मजूर पदावर महापालिकेची फसवणूक करून बेकायदेशीर व नियमबाह्यरीत्या अनुकंपा तत्वावर नेमणूक दिली अाहे. मात्र, सेवा पुस्तकातील छायांकित नियुक्ती आदेशात भास्कर काेळी यांचा अर्ज, दिनांक व मृत दिनांक अादी माहिती नमूद नाही. काेळी यांच्या सेवापुस्तकात शिधापत्रिका, वारस दाखला, संमतीपत्र अशी नियुक्तीची कागदपत्रे आढळली नाहीत. काेळी यांची नियुक्ती २२ मे २००७ च्या आदेशानुसार झाली असून त्यांच्या सेवा पुस्तकात ४ अाॅक्टाेबर २०१० राेजी लिहून दिलेले मूळ प्रतिज्ञापत्र नियुक्तीनंतर तब्बल तीन वर्षांनंतर जाेडल्याचे दिसत अाहे. याप्रकरणी काेळी यांच्या सेवा पुस्तकात बेकायदेशीर व नियमबाह्यरीत्या नियुक्तीची नाेंद करून तत्कालीन वेतन लिपिक विलास दामू निकम यांनी स्वाक्षरी केल्याचे त्यांना दिलेल्या नाेटिसीत म्हटले अाहे. विशेष म्हणजे काेळी यांना बनावट नियुक्ती देऊन वेतनवाढ, वेतन अायाेग, वेतन भत्ते लागू केल्याचेही त्यात म्हटले अाहे.
केस नंबर ३ :
अनिल काेळी यांचीही पाणीपुरवठा विभागाच्या शेड्युलवर हेल्पर, मजूर या पदावर अनुकंपा तत्वावर बेकायदा नियुक्ती करण्यात आली अाहे. सेवा पुस्तकातील छायांकित नियुक्ती आदेशात अनिल काेळी यांचा अर्ज, दिनांक, कै. दिनकर नामदेव काेळी यांचा मृत्यूचा दिनांक, मृत्यू दाखला तसेच सन २००८ च्या आदेशातील अटींचा जाणीवपूर्वक विचार न करता त्याकडे दुर्लक्ष केले अहे. तसेच अनिल काेळी यांच्या सेवा पुस्तकात वाल्मीक सुपडू सपकाळे यांचे मूळ हमीपत्र (स्टॅम्प पेपर) जाेडण्यात अाले असून त्याचे प्रयोजन काय याचा बाेध हाेत नाही. तसेच हमीपत्र दाेन वर्षानंतर जाेडण्यात अाल्याचे नाेटीसमध्ये म्हटले अाहे. बनावट कागदपत्रांची जाेडणी करून प्रशासनाची दिशाभूल करण्यात अाली असून सेवा पुस्तकात वरिष्ठ लिपिकाची स्वाक्षरी डावलून स्वाक्षरी केल्याचे दिसून आले अाहे. या सर्व प्रकरणात विलास निकम यांना दाेषी धरण्यात अाले अाहे. त्यांनी वस्तुस्थिती लपवून खाेटी व बनावट माहिती व कागदपत्रांच्या अाधारे या बेकायदा नियुक्त्या दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.