आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातून बालकाला पळवून नेले बंगालमध्ये; भाड्याच्या घरात राहून गट्टी जमवून साधला हाेता डाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील सुप्रीम कॉलनीतील १० वर्षीय बालकास शेजारी राहणाऱ्या महिलेने १० जून रोजी फूस लावून बंगाल येथे पळवून नेले हाेते. ही घटना रविवारी (दि. १७) उघडकीस आली. बालकास पळवून नेणारी महिला बंगाल येथे हिस्ट्रिशीटर अाहे. वर्षभरानंतर ती बंगालमध्ये आल्यामुळे तेथील पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने जळगावातून बालकास पळवून आणल्याची माहिती दिली. त्यानुसार बंगाल पोलिसांनी जळगाव एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. बालकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


उमरखान ऊर्फ गोलू असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. गोलूची आई बिलखीस जावेद खान (वय ३५, रा. सुप्रीम कॉलनी) या घरकाम करतात. १० जून रोजी त्या पाणी भरण्यासाठी घराबाहेर गेल्या असता शेजारी राहणाऱ्या सोनाली (पूर्ण नाव माहीत नाही) या महिलेने बिलखीस यांच्या घरात येऊन गाेलूला ताब्यात घेतले. बाजारात जाण्याच्या बहाण्याने तिने गोलूला रिक्षात बसवून सुप्रीम कॉलनीतून बाहेर आणले. बिलखीस घरी अाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा दानिश याने ही माहिती त्यांना दिली. बाजारात गेला असल्यामुळे काही तास खान कुटुंबीय निश्चिंत राहिले. दरम्यान, दुपारी बिलखीस यांनी सोनालीस फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचा मोबाइल बंद होता. त्यामुळे खान या प्रचंड घाबरल्या. रात्रभर त्यांनी सोनालीस फोन लावण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेर ११ जून रोजी रात्री ८ वाजता सोनालीने स्वत: बिलखीस यांना फोन केला. गोलू आपल्यासोबत असल्याची माहिती दिली. बिलखीस यांनी गाेलूसोबत संवादही साधला. आपण बंगाल येथे आले असून दोन दिवसात पुन्हा जळगावात येणार असल्याची माहिती सोनालीने दिली होती. परंतु, नगरदेवळा येथे राहणाऱ्या गोलूच्या आजीचे निधन झाल्यामुळे त्याला ताबडतोब परत घेऊन येण्याचे बिलखीस यांनी सांगितले. यानंतर सोनालीने गोलूस परत आणले नाही. याउलट बिलखीस यांनी नंतर फोन केल्यावर उडवा-उडवीचे उत्तर देऊ लागली. अखेर रविवारी बंगाल पोलिसांनी सोनालीस ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने जळगावातून बालकाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानुसार बंगाल पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क केला. पोलिस निरीक्षक अनिरुद्ध आढाव, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, रामकृष्ण पाटील यांनी सुप्रीम कॉलनीत जाऊन माहिती घेतली. यानंतर रात्री ८ वाजता बिलखीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनालीच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलिस सोमवारी सोनाली हिस घेऊन येण्यासाठी बंगाल येथे जाणार आहेत. 


बालकांचे अपहरण, विक्री करणारे रॅकेट : गेल्या वर्षी अशाच एका अपहरणाच्या प्रकरणात सोनालीवर बंगाल येथे गुन्हा दाखल आहे. बालकांचे अपहरण करून त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटसोबत सोनालीचे संबंध असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळेच तिने बंगाल येथून पलायन करीत जळगाव गाठले होते. दरम्यान, एका वर्षात तिने जळगावातून बालकाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे सुप्रीम कॉलनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


अपहरण करून विक्री करणाऱ्या रॅकेटची शक्यता 
सोनाली ही गेल्या वर्षी सुप्रीम कॉलनी येथे भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी आली होती. तिने शेजारी राहणाऱ्या लहान मुलांशी गट्टी केली होती. सोनाली ही बंगाल पोलिसांच्या दप्तरी लहान मुलांच्या अपहरण प्रकरणात हिस्ट्रिशीटर आहे. वर्षभरानंतर ती पश्चिम बंगाल येथे परतल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी तिची चौकशी केली. तिच्या घरी १० वर्षीय बालक आढळून आला. खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. गोलूला जळगावातून पळवून आणल्याचेे तिने सांगितले. त्यानुसार बंगाल पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, बालकांचे अपहरण करून विक्री करणारे हे रॅकेट असू शकते. 

बातम्या आणखी आहेत...