आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीला अखेरचा फोन करून निराश तरुणाने घेतला गळफास, प्रेमभंगाचा आघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कुटुंबीयांचा होकार असताना प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे निराश प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी १.३० वाजता दांडेकरनगरात घडली. दरम्यान, मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी तीन पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली हाेती. यातूनच त्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट झाले असून आत्महत्या करण्यापूर्वी त्याने अखेरचा फोन प्रेयसीला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

 

धीरज पद्माकर चौधरी (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुळचे ममुराबाद येथील चौधरी कुटंुबीय शहरात वास्तव्यास आहे. धीरज हा शहरातील एका मेडिकल डिस्ट्रीब्युटर्सकडे सेल्समन म्हणून काम करीत होता. त्याचे त्यांच्याच समाजातील एका तरुणीवर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचीही तयारी केली हाेती. धीरजच्या कुटुंबीयांनी देखील या लग्नास होकार दिलेला होता. परंतु स्वत: तरुणीने लग्नास नकार दिल्यामुळे तो काही दिवसांपासून अस्वस्थ होता. मंगळवारी त्याचे आई-वडील भुसावळ येथे नातेवाइकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. वैफल्यग्रस्त अवस्थेत त्याने दुपारी घरात एकटा असताना पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी २.४५ वाजता चौधरी दाम्पत्य घरी परतले.


या वेळी दरवाजा उघडत नसल्यामुळे आई सुनंदा यांनी खिडकीतून आत डोकावले असता धीरजने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. हे चित्र पाहून त्यांना जबर धक्का बसला. आरडा-ओरड करताच शेजारचेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फोन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह सिव्हिलमध्ये आणला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून धीरजला मृत घोषित केले. सायंकाळी ६ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेश ठोंबरे तपास करीत आहेत. धीरज याच्या पश्चात आई-वडील व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.  


प्रेयसीसोबतच अखेरचा संवाद : आत्महत्या करण्यापूर्वी धीरजने प्रेयसीसोबत मोबाइलवर संवाद साधला आहे. पाेलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याचा मोबाइल, सुसाइड नोट जप्त केली आहे. मोबाइलमधील कॉल डिटेलनुसार शेवटचा कॉल प्रेयसीलाच केल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या दोघांमध्ये काय संवाद झाला हे आता पोलिस तपासातच समोर येणार आहे.


सुसाइड नोटमधून होणार उलगडा
धीरजच्या पॅण्टच्या खिशात तीन पानी चिठ्ठी सापडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या सुसाइड नोटमुळे अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे हताश होऊन त्याने हे पाऊल उचलल्याचे प्रमुख कारण समोर येते आहे. याशिवाय काही जणांची नावे त्याने नोटमध्ये लिहिली आहेत. तसेच आत्महत्या करीत असल्यामुळे आई-वडिलांची माफी देखील मागितली आहे. ही सुसाइड नोट रामानंदनगर पोलिसांनी हस्तगत केली आहे. यावरून पुढील तपास केला जाणार आहे.

 

शिवजयंतीपूर्वीच केला हाेता आत्महत्येचा विचार
धीरज हा अतिशय देखणा तरुण होता. मित्रांचाही लाडका होता. घटनेनंतर त्याच्या अनेक मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून दु:ख व्यक्त केले. धीरजने नवीन स्टाइलमध्ये दाढी वाढवून चेहऱ्याचा लूक बदलला होता. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या दिवशी त्याने कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सेल्फी घेतला होता. दरम्यान, आपण शिवजयंतीपूर्वीच आत्महत्या करण्याचा विचार करीत होतो. परंतु काही दिवस थांबून अखेर मंगळवारी आत्महत्या करीत असल्याचे देखील सुसाइड नोटमध्ये नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...