आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत तर्र तरुणांच्या कारची दुचाकीला धडक; 3 जखमी, नागरीकांकडून बेदम चोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चारचाकी वाहनातच भरपूर मद्य पिऊन मौजमजा करणाऱ्या चौघांनी रस्त्यावरील अनेक दुचाकीस्वारांना कट मारले. तर आसोदा गावाजवळ एका दुचाकीस जोरदार धडक दिली. या दुचाकीवर बसलेले तीन जण गंभीर जखमी झाले. यामध्ये लग्नासाठी मुलगी पाहायला जाणाऱ्या दुचाकीस्वार सैनिकाच्या उजव्या मांडीच्या हाडाचे तुकडे झाले. ग्रामस्थांनी या मद्यपींना चांगलाच चोप दिला. बुधवारी दुपारी ४ वाजता हा अपघात घडला.

 

भूषण सुनील कोळी (वय २४, रा.निम, ता.अमळनेर) असे जखमी सैनिकाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेली त्याची मावशी तुळसाबाई भीमराव कोळी व त्यांचा मुलगा सतीश (दोघे रा.तांदळी, ता.अमळनेर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भूषण भारतीय सैन्यात नोकरीस आहे. नातेवाइकाच्या लग्नानिमित्ताने भूषण याने १० दिवसांची सुटी काढली होती. बुधवारी चांदसर (ता.धरणगाव) येथे तो एका लग्नात हजर होता. दरम्यान, भूषण याचेदेखील या वर्षी लग्न करण्याची योजना कुटंुबीयांनी आखली होती. त्या अनुषंगाने भादली येथील मुलगी पाहण्यासाठी भूषण हा मावशी व मावसभाऊ यांच्यासोबत दुचाकीने निघाला होता. आसोदा गावाजवळ पोहोचताच त्यांच्या दुचाकीस समोरुन येणाऱ्या एका चारचाकीने (एमएच १९ सीके ५०१) जोरदार धडक दिली. या अपघातात भूषणच्या उजव्या पायाच्या मांडीजवळील हाड अक्षरश: मोडले.


तुकडा पडल्यामुळे हाड मांसातून बाहेर आले होते. अशाही अवस्थेत भूषण याने स्वत:ला सावरत मावशी तुळसाबाई व मावसभाऊ सतीश यांना धीर दिला. अपघाताची भीषणता पाहून घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. अपघातात त्यांची दुचाकी व धडक देणाऱ्या चारचाकीचा पुढील भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना खासगी रिक्षातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींची खासगी रुग्णालयात रवानगी करण्यात आली.


कार भुसावळातील उच्चभ्रू व्यक्तीची
चारचाकी भुसावळ शहरातील एका उच्चभ्रू कुटंुबातील व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चारचाकीमध्ये बसलेले चौघे जण हॉटेल व्यवसायी, राजकीय पक्षांशी संबंधित होते. चौघांनी येथेच्छ दारू घेतली असल्यामुळे त्यांना स्थिर उभे राहणेही अवघड जात होते. अपघातानंतर काही अंतर पुढे जाताच नागरिकांनी चारचाकी रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर गाडीतून बाहेर काढून चौघांना येथेच्छ चोप दिला. तसेच जखमींच्या औषधोपचाराचा खर्च करण्यासाठी चौघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पकडून आणले होते. तडजोड करण्याच्या उद्देशाने काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील रुग्णालयात दाखल झाले होते.

 

बातम्या आणखी आहेत...