आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठीत वार करणाऱ्या पाकला धडा शिकवा; शहीद योगेश यांच्या वडिलांची आर्त हाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा (जि.धुळे)- ‘साहेब, माझ्या मुलाच्या पाठीवर गोळी मारली हो त्यांनी. आमचा आधार गेला.  त्यांना धडा शिकवा’, अशी प्रतिक्रिया शहीद योगेश यांचे वडील मुरलीधर भदाणे यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. दरम्यान, साेमवारी शहीद याेगेश यांच्या पार्थिवावर खलाणे या गावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत.


जम्मू- काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी जवानांनी केलेल्या गाेळीबारात शनिवारी  याेगेश शहीद झाले हाेते. मात्र रविवारी सकाळपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी समजू दिली नव्हती.  मात्र सकाळी त्यांच्या घरासमाेर मंडप टाकण्यात आला. गावात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले. त्यांच्या घरातील कपाशी काढून घेत आलेल्या पाहुण्यांसाठी घर रिकामे करण्यात आले. हे चित्र पाहताच योगेश यांच्या आईने हंबरडा फोडला. वडील तर नि:शब्द झाले. ‘आमची म्हातारपणाची काठी गेली’, असा आक्रोश वडिलांनी केला.  दिवसभर योगेश यांच्या घरासमोर गर्दी होती. पर्यटनमंत्री जयकुमार रावल व इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी योगेश यांच्या वडिलांचे सांत्वन केले. साहेब, माझ्या मुलाला पाठीमागून गोळी मारली. त्यांना धडा शिकवा, अशी आर्त हाक या वेळी योगेश यांचे वडील प्रत्येकाला देत होते. भदाणे दांपत्याच्या पोटात दिवसभर अन्नाचा कणही गेला  नव्हता. गावातील महिला योगेशच्या आईला आधार देण्यासाठी त्यांच्याजवळ बसून होत्या.    


प्रवेशद्वाराला देणार नाव  
शहीद योगेश यांच्या अंत्यसंस्कारासाठी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. चौथरा बांधण्यात आला. श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर तयार करण्यात आले. अंत्यसंस्काराला होणारी गर्दी लक्षात घेऊन जागोजागी पिण्याच्या पाण्यासाठी ड्रम ठेवण्यात आले.  गावातील तरुण स्वेच्छेने सर्व कामे करत होती.  गावाबाहेर वायपूर रस्त्यावर असलेल्या प्रवेशद्वाराला शहीद योगेश भदाणे यांचे नाव देण्याचा निर्णय खलाणे येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...