आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नूतन मराठा' महाविद्यालयामध्‍ये हाणामारी; स्नेहसंमेलन अर्ध्यावरच बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नूतन मराठा महाविद्यालयामध्ये शुक्रवारी विद्यार्थ्यांचे 'उमंग' वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये बाहेरून आलेले युवक आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये दिवसभरात चार वेळेस गाण्याच्या तालावर नाचण्यावरून हुल्लडबाजी व तुंबळ हाणामारी झाली. यादरम्यान स्नेहसंमेलनामध्ये पळापळ आणि प्रचंड गोंधळ झाल्यामुळे अखेर प्राचार्यांनी हे स्नेहसंमेलन अर्ध्यावरच आटोपते घेतले.

 

उमंग स्नेहसंमेलनाला सकाळी १०.३० वाजता प्रारंभ झाला. संस्थेच्यावतीने संचालक किरण साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त राखण्याचे आवाहन केले खरे. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या कलाविष्कारादरम्यान शिस्तीचा भंग झाला. गणेश वंदनेनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. आदिवासी नृत्य, रिमिक्स डान्स, मिमिक्री, नूतन गायक-गायिका स्पर्धा, एकल डान्स, रिमिक्स डान्स आदी कलाप्रकार विद्यार्थी सादर करीत होते. या वेळी बाहेर गोंधळ सुरू होता. महाविद्यालय व्यवस्थापनातर्फे प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासून आतमध्ये प्रवेश दिला जात होता. महाविद्यालयाचे चार ते पाच कर्मचारी ओळखपत्र तपासत होते. मात्र, तरीही भिंतीवरून व इतर ठिकाणावरून बाहेरच्या टवाळखोर तरुणांनी महाविद्यालयात प्रवेश केला.


गाण्याच्या तालावर विद्यार्थी नाचत होते. शिट्ट्या, हुल्लडबाजीला सुरुवात झाली. विद्यार्थिनींवर शेरेबाजी करण्यात आली. बाहेरील तरुणांचे टोळकेही मंडपात नाचत होते. नाचताना धक्का लागला. या कारणावरून बाहेरील टोळके व विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. चार वेळेस स्नेहसंमेलनामध्ये हाणामारी झाली. प्रचंड गोंधळ झाल्यामुळे जिल्हापेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यानंतरही हाणामारी झाली. स्नेहसंमेलन बघण्यासाठी आलेल्या एका पालकाचीही या हाणामारीदरम्यान कॉलर पकडण्यात आली. ते युवकांच्या मागे धावले. प्रचंड गोंधळ झाल्यानंतर प्राचार्य देशमुख यांनी सात कलाविष्कार सादर करण्याचे राहिलेले असूनही दुपारी ४.३० वाजता स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम थांबवण्याच्या सूचना प्राध्यापकांना केल्या.अखेर हे स्नेहसंमेलन अर्ध्यावरच थांबवण्यात आले. तत्पूर्वी, सकाळी स्नेहसंमलनाचे उद््घाटन कवी डॉ.अरुण अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील होते. संस्थेचे संचालक डी.डी.पाटील, मनोहर सुर्वे, किरण साळुंखे, दीपक सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, उपप्राचार्य एस.डी.पाटील आदी उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात डॉ.अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना विविध छंद जोपासण्याचे आवाहन केले. तसेच कविता आणि अनुवादित गाणे सादर करून मंत्रमुग्ध केले.


गोंधळ झाल्याने स्नेहसंमेलन थांबविले
स्नेहसंमेलनात बाहेरून आलेल्या तरुणांनी गोंधळ घातला. ते स्टेजच्या पाठीमागेही गेले होते. विद्यार्थिनींनी तक्रार केल्यामुळे त्यांना महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अडवले. गोंधळ झाल्यामुळे स्नेहसंमेलन थांबवण्यात आले. उद्या शनिवारी वार्षिक पारितोषिक वितरण व शेला पागोटे कार्यक्रम होणार आहे. असे प्रकार रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.
- डाॅ.एल.पी. देशमुख,प्राचार्य

बातम्या आणखी आहेत...