आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदखेडा / धुळे- पाकिस्तानशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील शहीद जवान योगेश भदाणे याला साेमवारी हजाराेंच्या साक्षीने अखेरचा निराेप देण्यात अाला. लष्करदिनी (१५ जानेवारी) या बहाद्दर जवानावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात अाले. सात वर्षांचा पुतण्या मोहित याने मुखाग्नी दिला. या वेळी पाकिस्तानच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहीद भदाणे यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.
जम्मू-काश्मिरात कर्तव्य बजावताना पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शनिवारी योगेश शहीद झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत खलाणे येथे येणार होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे जम्मू येथून हेलिकाॅप्टर उड्डाणास दोन तास उशीर झाला. जम्मू येथून त्यांचा पार्थिव देह नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे आणण्यात आला. तेथून सायंकाळी सव्वापाच वाजता हेलिकाॅप्टरने खलाणे गावात त्यांच्या घरी आणण्यात आला. या वेळी त्यांचे आई, वडील, दोन्ही बहिणी आणि पत्नीने एकच आक्रोश केला. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर बाळा ऊर्फ योगेश भदाणे यांचा पार्थिव देह ठेवण्यात आला. त्यांच्या बाजूला पत्नी, वडील, दोन्ही बहिणी होत्या. अंत्ययात्रेत २५ ते ३० हजार नागरिक सहभागी झाले. अंत्ययात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी ‘शहीद योगेश अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. वायपूर रस्त्यावर सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी शहीद योगेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणवेश पाहताच अाई, पत्नीने फाेडला हंबरडा
सैन्य दलासह जिल्हा पोलिस दलातर्फे शहीद याेगेश यांना प्रत्येकी तीन राउंड फायर करून मानवंदना देण्यात अाली. अंत्यविधीपूर्वी शहीद योगेश यांचा रक्ताने माखलेला गणवेश आई, वडील, पत्नी यांना दाखवण्यात आला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी अक्षरश: हंबरडा फाेडला.
गावात स्मारक उभारणार
योगेश भदाणे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. जिल्ह्याच्या वीर सुपुत्राचा अभिमान आहे. खलाणे गावात शहीद योगेश यांचे स्मारक उभारण्यासाठी शासन पातळीवर सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल. योगेश यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल.
दादा भुसे व जयकुमार रावल, मंत्री
शहीद योगेश भदाणे यांना नाशकात मानवंदना
नाशिकच्या ओझर विमानतळावर भदाणे यांचे पार्थिव दुपारी दाखल झाले. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी ओझर येथे मानवंदना दिली. त्यानंतर खलाणे गावाकडे चॉपर हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिव रवाना झाले.
'साहेब, माझ्या मुलाच्या पाठीवर गोळी मारली हो त्यांनी. आमचा आधार गेला. त्यांना धडा शिकवा', अशी प्रतिक्रिया शहीद योगेश यांचे वडील मुरलीधर भदाणे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी जवानांनी केलेल्या गोळीबारात शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील जवान योगेश मुरलीधर भदाणे (वय-28) शनिवारी शहीद झाले होते.
खराब वातावरणामुळे विलंब...
वातावरण खराब असल्याने जम्मू येथून योगेश भदाणे यांचे पार्थिव घेऊन येणारे हेलिपॅड थांबून असल्याची माहिती सकाळी मिळाली होती.
वडील नि:शब्द...
गावात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले. त्यांच्या घरातील कपाशी काढून घेत आलेल्या पाहुण्यांसाठी घर रिकामे करण्यात आले. हे चित्र पाहताच योगेश यांच्या आईने हंबरडा फोडला. वडील तर नि:शब्द झाले. 'आमची म्हातारपणाची काठी गेली', असा आक्रोश वडिलांनी केला.
दिवसभर योगेश यांच्या घरासमोर गर्दी होती. पर्यटनमंत्री जयकुमार रावल व इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी योगेश यांच्या वडिलांचे सांत्वन केले. साहेब, माझ्या मुलाला पाठीमागून गोळी मारली. त्यांना धडा शिकवा, अशी आर्त हाक या वेळी योगेश यांचे वडील प्रत्येकाला देत होते. भदाणे दांपत्याच्या पोटात दिवसभर अन्नाचा कणही गेला नव्हता. गावातील महिला योगेशच्या आईला आधार देण्यासाठी त्यांच्याजवळ बसून होत्या.
आठ महिन्यांपूर्वीच झाला विवाह
योगेश हे 2008 मध्ये सैन्यदलात भरती झाले. ते 108 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. शेतकरी कुटुंबातील योगेश भदाणे यांना दाेन विवाहित बहिणी असून दोन्ही मेहुणे सैन्यात आहेत. 8 महिन्यांपूर्वीच योगेश यांचा मंगरूळ (ता.पारोळा)येथील पूनम यांच्याशी विवाह झाला हाेता. त्यानंतर चार महिन्यांनी ते सुटीवर घरी आले होते. दोन महिन्यांपूर्वी ते पत्नीला सोबत घेऊन गेले होते. योगेश यांच्या पश्चात पत्नी, वडील मुरलीधर, आई मंदाबाई, दोन बहिणी असा परिवार आहे.
खलाणे गावावर शोककळा...
- खलाणे गावाचा सुपुत्र योगेश भदाणे त्यांचा मृतदेह खलाणे गावात सोमवारी आणण्यात येणार आहे. त्याच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
- योगेश यांच्या अंत्यविधीची तयारी खलाणे गाव आणि प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
- वायपूर रस्त्यावर बिसा भिकन फकीर यांच्या शेतजमिनीवर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.