आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा गावात माणसं नाही, राक्षस राहतात; मृत दादाराव भोसलेंच्या पत्नी नर्मदाबाईंनी फोडला टाहो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात जमावाने ५ जणांची ठेचून हत्या केल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शाेक अनावर - Divya Marathi
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात जमावाने ५ जणांची ठेचून हत्या केल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शाेक अनावर

राईनपाडा (ता.साक्री)- राईनपाडा गावात माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. येथे माणसं नव्हेतर राक्षस राहतात. आम्ही येथे भिक्षा मागून पोटाची खळगी भरण्यासाठी येथे आलो होतो. पण या निर्दयी लोकांनी आमच्या पोटावरच धावा केला, असा रोष मृत दादाराव भोसले यांच्या पत्नी नर्मदाबाई भोसले यांनी यांनी व्यक्त केला. त्यांच्यासह मृतांच्या नातेवाईकांनी ग्रामीण पिंपळनेर रुग्णालयात हंबरडा फोडला.


राईनपाडा येथे मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन ग्रामस्थांनी पाच जणांची हत्या केली. पिंपळनेर येथे आठवडे बाजार असल्यामुळे भिक्षा मागण्यासाठी हे पाच जण सकाळी नऊ वाजता पिंपळनेरहून राईनपाडा येथे गेले. ही मंडळी मुली पळणारी असल्याच्या संशयावरून पाच जणांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. आमच्या सोलापूरकडे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आम्ही भिक्षा मागून उदरनिर्वाह करण्यासाठी पिंपळनेरला आलो होते. आठवडीबाजार असल्यामुळे भिक्षा चांगली मिळेल म्हणून येथे आल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या गावकऱ्यांनी माझे कुटूंब उद्धवस्त केले आहे. त्यांच्यावर कठोर शासन झाले पाहिजे, अशी व्यथा नर्मदाबाई भोसले यांनी पोलिसांकडे मांडली.


दादामामा कुठे गेले
‘साहेब आमची माणसं कुठे आहेत’, असा सवाल मृत पावलेल्या व्यक्तींच्या पत्नींनी पोलिसांना विचारला. तर, ‘मामा दादा कुठे गेले आम्हाला सोडून, तुम्ही संध्याकाळी खाऊ घेऊन येणार होता पण आलेच नाही. कुठे गेले मामा दादा तुम्ही दिसत नाही’, अशी हाक मृत दादाराव शंकर भोसले यांच्या नातीने दिली.त्यामुळे रुग्णालय परिसरात लाेकांना भावना अनावर झाल्या हाेत्या.


त्यांनी ऐकले असते तर जीव वाचला असता
सध्या मुली पळवण्याच्या संशयावरून मारहाणीच्या घटना घडताहेत, लोक आक्रमक आहेत. त्यामुळे भिक्षा मागायला जाऊ नका, असा आग्रह मृत भोसलेंच्या नातेवाईकांनी धरला होता. परंतु, आपण गरीब आहोत. आपल्याला कुणी कशाला मारणार, या विचाराने भोसले कुटंुबीय भिक्षा मागण्यासाठी गेले होते. त्यांनी नातेवाईकांचे एेकले असते तर आज जीव गेला नसता, अशी खंत संतोश भोसले यांनी व्यक्त केली.


चुल न पेटल्याने लहान बालके उपाशीच
सामोडे परिसरातील सहा झोपड्यांत हे सहा भिक्षुक कुटुंब राहतात. या हत्याकांडानंतर एकाचीही चूल पेटली नाही. महिला व लहान बालके उपाशीपोटी झोपले. आमची भिक्षुक म्हणून ताहाराबाद व पिंपळनेर येथे पोलिस ठाण्यात नोंद  केली आहे.
- शारदा चौगुले, पीडित, पंढरपूर, सोलापूर


अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई
कोणत्याही गावात अनोळखी व संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा अन्यथा, १०० नंबरवर फोन करून तशी माहिती कळवावी. कायदा हातात घेऊन कोणत्याही निष्पाप व्यक्तींना नागरिकांनी मारहाण करू नये. शिवाय मोबाईलवर अफवा पसरवणा ऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करणार आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तींनी सोशल मिडियावर त्या प्रकारचे व्हिडिओ व फोटो व्हायरल करू नयेत.
- राम कुमार, पोलिस अधीक्षक, धुळे


पाेलिस पाटील, सरपंच जबाबदारी झटकून गायब 
या हत्याकांडाची माहिती गावाचे सरपंच किंवा पाेलिस पाटलांनी पाेलिसांना माहिती देणे गरजेचे हाेते. मात्र तसे न करता  राईनपाडाचे सरपंच व पाेलिस पाटील गायब झाले. घटनेबाबत एका पंचायत समिती सदस्याने पिंपळनेर पाेलिसांना फाेन करून माहिती कळविली. त्यानंतर पाेलिस गावाकडे रवाना झाले.


कठाेर शासन करणार
या घटनेची मुख्यमंत्र्यांसह गृह विभागाच्या सचिवांना माहिती दिली आहे. ज्यांनी अफवा पसरवली आणि ज्यांनी ही घटना घडविली अशांवर कठोरात कठाेर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- दादा भुसे, पालकमंत्री,धुळे

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा घटनेसंबंधित फोटो....

बातम्या आणखी आहेत...