आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा गळा आवळला, कोयत्याने चेहरा ठेचला; बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा- तालुक्यातील परधाडे येथे पत्नीसह आठ दिवसांपूर्वी सासरवाडीत आलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने खून केला होता. मात्र, त्याने त्याची पत्नी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीचा चेहरा कोयत्याने ठेचून तिचा गळा आवळून खून केला असावा, असा संशय पोलिस व्यक्त करू लागले आहेत.

 

लोणवाडी (ता. जळगाव) येथील अनिल मानसिंग भिल हा त्याची पत्नी रेखा बाई अनिल भिल हिच्यासह आठ दिवसांपूर्वी परधाडे (ता. पाचोरा) येथे सासरवाडीत राहण्यासाठी आला होता. १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हे दांपत्य परधाडे शिवारात सर्पण आणण्यासाठी गेले होते. याप्रसंगी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर अनिल याने रेखा भिल (वय २९) हिचा गळा दाबून खून केला. परंतु, हे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ नये, म्हणून त्याने पत्नीचा चेहरा कोयत्याने चेंदामेंदा केला. त्यानंतर घाबरुन त्याने स्वत: विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही परिसरातील कामगारांच्या लक्षात आला. त्यांनी गावाकडे धाव घेऊन या घटनेबाबत अनिल याच्या सासऱ्याला सांगितले.

 

सासरे बबन देवराम भिल यांनी तातडीने जावाई अनिल भिल यास उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात सासऱ्याने जावयाविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मृत रेखा भिल हिच्यावर परधाडे येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.