आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: वाळूमाफियांच्या शोधार्थ भल्या पहाटे जिल्हाधिकारी गेले गिरणा नदीपात्रात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी अवैधरित्या बेसुमार उत्खनन व वाहतुकीचा कहर केला अाहे. एवढेच नव्हे तर कारवाईसाठी गेलेल्या महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत वाळूमाफियांची मजल गेली अाहे. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर हे शनिवारी पहाटे ४ वाजता गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांचा शोध घेण्यासाठी गेले हाेते. शहरातही विविध भागात त्यांनी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. दरम्यान, वाळूचाेरांना तपासणीची माहिती वेळीच मिळाल्यानेे पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले.

 

जळगाव तालुक्यात वैजनाथ वाळूगटाचा लिलाव झालेला आहे. असे असले तरीदेखील गिरणा नदीपात्रातून दिवस-रात्र अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत अाहे. याविषयी ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. वैजनाथ वाळू गटाजवळून तब्बल २३० ब्रास अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात आलेला आहे. त्यामुळे भले मोठे खड्डे नदीपात्रात पडले होते. हे खड्डे जेसीबीच्या साहाय्याने बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर एरंडोल तहसीलदार आबा महाजन, जळगाव तहसीलदार अमोल निकम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने वैजनाथ वाळू गटाची संयुक्त मोजणी केली होती. त्यामध्ये नदीपात्रातून अवैधरित्या २३० ब्रास अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात आल्याचा अहवाल पथकाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वैजनाथ वाळू गटाचे ठेकेदार धनराज घुले यांना नोटीस बजावली. तरीही तालुक्यातून अवैध वाळू उपशाबाबत तक्रारींचा ओघ कायम होता. त्यामुळे शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, तहसीलदार अमोल निकम यांनी गिरणा नदीच्या पात्रात उतरून वाळूमाफियांचा शोध घेतला. त्यांनी वैजनाथ वाळू गटाचीही पाहणी केली. या तपासणीमुळे वाळू माफिया धास्तावले अाहे.


या पुढेही अशीच तपासणी नियमित सुरू राहणार
गेल्या महिन्यात खेडी रस्त्यावर अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याला वाळू तस्करांनी ट्रॅक्टरवरून फेकले होते. त्यानंतर ते ट्रॅक्टर घेऊन पळून गेले होते. कारवाई होत असली तरी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद झालेली नाही. प्रशासनाने तालुक्यात वर्षभरात २०५ अवैध वाळूच्या वाहनांवर कारवाई केली. ९० गुन्हे दाखल केले आहेत. अवैध वाळू उत्खननाबाबत अशाच पद्धतीने यापुढेही तपासणी सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...