आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री चंद्रकांत पाटील, उदय वाघ वाळू, ड्रग्ज माफियांच्या पाठीशी- नावाब मलिक; जळगाव भाजपत भूकंप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अमळनेर येथे पाेलिसांनी पकडलेल्या गांजाप्रकरणी गुन्हा दाखल हाेऊ नये म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी संबंधित व्यक्तीकडून १० लाख रुपये घेतले अाहेत. दाेन दिवसांपूर्वीच अाैरंगाबाद जिल्ह्यात भाजपचे अामदार प्रशांत बंब यांनी पाेलिस ठाण्यात जावून गुटख्याची पकडलेली गाडी साेडवण्यासाठी पाेलिसांशी हुज्जत घातली. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जळगाव कार्यालयात दिवसभर वाळूमाफियांचे ट्रॅक्टर, डंपर साेडवण्यासाठी प्रशासनावर दबाव अाणला जाताे. भाजपचे सरकार अवैध धंदे आणि माफियांची पाठराखण करीत आहे, असा अाराेप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला. 


संपूर्ण राज्य अवैध धंदे अाणि गुंडागर्दीच्या दहशतीखाली वावरत अाहे. एकट्या अमळनेर शहरात ३०० पेक्षा अधिक गावठी कट्टे विक्री झाले अाहेत. गांजा, चरस, ड्रग्ज अाणि वेश्या व्यवसायाचे अमळनेर हे अागार झाले असून तेथील व्यापारी बाबा बाेहरी अाणि प्रा. दीपक पाटील यांचा खून झाला अाहे. पाेलिसांनी काही दिवसांपूर्वी चाळीसगावमार्गे अमळनेरमध्ये येणारा राजेश कंजर यांचा गांजा पकडला हाेता. या प्रकरणात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजेश कंजर याच्याकडून १० लाख रुपये घेतले हाेते. पैसे देऊनही गुन्हा दाखल हाेऊन कारवाई झाल्याने कंजर यांनी उदय वाघ यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. त्या वेळी वाघ यांनी त्यातील ५ लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरीत पैसे तुमच्या धांद्याला संरक्षण देण्यासाठी पोलिस निरिक्षक आणि पोलिस अधिक्षकांना दिल्याचे उत्तर यावेळी देण्यात आले. याबाबादचा संवाद झालेली क्लिप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. या क्लिपमध्ये प्रफुल्लभाई नामक व्यक्तीच्या मध्यस्थीने उदय वाघ यांनी पैसे घेतल्याचा उल्लेख आहे.


काय आहे आरोप 
- गांजा प्रकरणात जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी १० लाख घेतले 

- महसूलमंत्री पाटील यांच्या कार्यालयातून वाळूमाफियांसाठी प्रशासनावर दबाव 
 

वाघ यांची पक्षातून हकालपट्टी करा 
उदय वाघ यांनी अमली पदार्थ विक्रीला संरक्षण देण्यासाठी १० लाख रुपये घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. याचे त्यांनी पुरावेदेखील मांडले अाहेत. जीवन उद्धवस्त करणाऱ्या अंमली पदार्थ व्यवसायाशी संबंधित असल्याने भाजपची बदनामी होत आहे. पक्षाने हे प्रकरण गांभिर्याने घेऊन उदय वाघ यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. 


बाेलविता धनी दुसराच 
राष्ट्रवादीचे नवाब मलिक अाणि अनिल भाईदास पाटील हे केवळ प्यादे अाहेत. यांचा बाेलविता धनी दुसराच अाहे. माझ्यावर करण्यात अालेले अाराेप हे राजकीय षडयंत्र अाहे. राजकीय वैफल्यातून हे घडत अाहे. राष्ट्रवादीने एका गुन्हेगार व्यक्तीवर विश्वास ठेवून माझ्यावर अाराेप केले अाहेत.पक्षश्रेष्ठींकडे याबाबत म्हणणे मांडणार आहे. त्यांनी सांगितले तर मी राजीनामा देईल. तसेच या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी करणार अाहे. 
- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष भाजप. 

बातम्या आणखी आहेत...