आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाही अन् लांबपल्ल्याच्या बसकडे प्रवाशांनी फिरवली पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून केलेल्या १८ टक्के भाडेवाढीचा फटका प्रवाशांना बसला आहे. खास करून शिवशाही बसचे भाडे अधिच जास्त असल्याने या भाडेवाढीमुळे त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शनिवारी प्रवास करताना अनेक प्रवाशांनी शिवशाही बसने तसेच लांबपल्ल्याच्या बसने प्रवास करणे टाळले. तसेच अनेक प्रवाशांना भाडेवाढसंदर्भात माहिती नसल्याने त्यांची गैरसोय झाली. दरम्यान, भाडेवाढीच्या परिणामामुळे पहिल्या दिवशी शिवशाहीसह रातराणी अथवा कोणत्याही लांबपल्ल्याच्या बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या नसल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला. 


जळगाव आगारातून आसनी व स्लिपरकोच शिवशाही सेवेच्या एकूण ११ बसेस दररोज धुळे, औरंगाबाद, पुणे या मार्गावर धावत आहेत. या बसेसचीही भाडेवाढ झाली आहे. दिवसभरात औरंगाबादसाठी ३, धुळे ८ व पुणे २ फेऱ्या शिवशाही बसेसच्या होतात. यासह निमआराम बसेसही या मार्गावर धावतात. मात्र वातानुकुलित सेवेमुळे या बसेसला प्रवाशांकडून अधिक पसंती आहे. मात्र, भाडेवाढीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीचा आर्थिक भुर्दड सहन करावा लागणार आहे. शनिवारी शासकीय सुटीमुळे प्रवासीसंख्या नेहमीपेक्षा कमी असली तरी, पहिल्या भाडेवाढीचा परिणाम दिसून आला. दरम्यान, शनिवारी सकाळी प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागले. वाहकाकडून अतिरिक्त भाडे आकारणी केल्यामुळे प्रवाशांनी संताप करीत नाराजी व्यक्त केली. 

 

ईटीआयएम अपडेट नसल्याने जुनेच भाडे 
नवीन दरानुसार तिकीट यंत्रामध्येही बदल करावे लागणार आहेत. त्या दृष्टीनेही तयारी केली जात आहे. शनिवारी दुपारपर्यत तिकीट देणाऱ्या ईटीआयएम मशीनमध्ये तांत्रिक बदल करण्याचे काम सुरुच होते. अनेक बसेसमध्ये ही यंत्रणा अद्यावत झालेली नसल्याने सकाळी वाहकांनी जुनेच तिकीट दिल्याचा प्रकार घडला. मात्र दुपारी बारावाजेनंतर सर्वच मशीनमधील यंत्रणा सुरळीत झाल्याचे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 


विद्यार्थी, प्रवासी पासही महागले 
महामंडळाने इंधन दरवाढीमुळे अखेर भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीमुळे विद्यार्थी, मासिक व प्रवासी पासही महागले अाहेत. याची नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही झळ बसणार आहे. यामुळे प्रवाशीसंख्याही रोडवणार असून याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावरही होणार असल्याची स्थिती आहे. 


शहरातही भाडेवाढ 
शहरातून विद्यापीठ तसेच आसोदा, शिरसोली, ममुराबाद, कानळदा, तरसोद, बांभोरी या सहा किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरही भाडेवाढ झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या पासेसमध्ये वाढ झाली आहे. मात्र अद्याप पासेसची भाडेवाढ निश्चित झालेले नसून पुढील दोन दिवसात ती प्रक्रिया पूर्ण होईल, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या भाडेवाढीमुळे आता आवडेल तेथे प्रवास, प्रासंगिक करार या प्रवासभाड्यातही वाढ निश्चित केली आहे. पुढील दोन दिवसात यासंबंधीचा चार्ट तयार होणार असल्याचेही संबधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. 


सुट्या नाण्यांची डोकेदुखी मिटवली 
प्रवासादरम्यान एक, दोन, पाच रुपयांच्या सुट्या नाण्यांवरुन होणारे वाद आता पूर्णपणे मिटणार आहे. किमान पाच रुपयांच्या पटीतच सर्वच भाडे आकारले असल्याने आता वाहकांसह प्रवाशांचाही ताण मिटला आहे. मात्र हा निर्णय काही प्रवाशांना सुखकारक तर काहींना तापदायक ठरला आहे. सहा किलोमीटरच्या एका टप्प्यापेक्षा थोडे अधिक अंतर असलेल्या ठिकाणी सरसकट भाडेवाढ केली आहे. त्याचा प्रवाशांना भुर्दंड बसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...